कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय! काय म्हणाले आरोग्यमंत्री?

105

कोरोनाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क आहे. ओमायक्राॅन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, राज्यात नव्याने काही निर्बंध लागू करण्यात आले होते. पण मागच्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट दिसून येत आहे. आता यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तिस-या लाटेविषयी तसेच बांधितांच्या आकडेवारीवर भाष्य करत, नागरिकांना दिलासा दिला आहे.

चिंतेची आवश्यकता नाही

प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, तिस-या लाटेचा सर्वोच्च बिंदू येऊन गेला आहे, असे म्हणता येईल. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी अचानक बाधितांची संख्या वाढत होती. ती आता तशी नाही. पण राज्याच्या इतर भागात त्याची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागातही वाढत आहे. पण सर्वजण ५ ते ७ दिवसांच्या उपचारांवर बरे होत आहेत. त्यामुळे इतर भागात वाढणारी बाधितांची संख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही.

टास्क फोर्सने मार्गदर्शन करावं

कोरोनासाठी तयार करण्यात आलेले ९२ ते ९५ टक्के बेड अद्याप रिक्त आहेत. फक्त ५ ते ७ टक्केच बेडवर रुग्ण आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण एक टक्के आहेत. बहुतेक बाधित होम क्वारंटाईन आहेत. त्यामुळे टास्क फोर्सने मार्गदर्शन करावं, जे निर्बंध आपण लावले आहेत ते किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळालं, तर त्याविषयी लोकांना दिलासा मिळू शकेल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

( हेही वाचा :अजित पवार म्हणतात, वाईन पिणारे राज्यात कमी, काळजी नको! )

नव्या व्हेरिएंटची काळजी नको

नव्या NEOCOV या व्हेरिएंटची चर्चा आहे. हा व्हेरिएंट घातक असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हेरिएंट फार घातक आहे ,असं मी ऐकलं आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. विशेष म्हणजे त्यात मृत्यूदर ३० टक्के आहे, असं सांगितलं गेलं आहे. तो सध्याच्या ओमायक्रॉनइतकाच वेगाने प्रसार होणारा आहे. वटवाघुळापासूनच याची सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण अद्याप यावर जागतिक आरोग्य संघटना अभ्यास करत आहे. त्याचे कोणतेही बाधित नव्याने कुठे आढळलेले नाहीत. त्यामुळे अद्याप त्यावर काळजी करण्याची आवश्यकता नाही, असं टोपे पुढे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.