एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या मृत्यूचे प्रमाणपत्र महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिले जाते. परंतु या प्रमाणपत्रासाठीच महापालिकेच्या कर्मचाऱ्याने मृतांच्या नातेवाईकांकडे पैसे मागितले. मृताचे हे नातेवाईक दुसरे, तिसरे कोणी नसून खुद्द पत्रकार शशांक राव हे होते. मृत्यू प्रमाणपत्रासाठी त्यांनी ५०० रुपये मोजले. परंतु ही बाब शशांक राव यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या कारकुनाला महापालिकेने निलंबित केले.
मृत्यू दाखल्यासाठी मागितले पैसे
मुंबई महापालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयामध्ये मृत्यू नोंदणी कारकून कार्यरत असलेले संतोष तांबे हे बाभई हिंदू स्मशानभूमी येथे १७ जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या रात्रपाळीत कार्यरत होते. त्यावेळी राजेंद्रकुमार कृष्णदास किनारीवाला (वय ७२) यांचे पार्थिव अंतिमसंस्कार करण्यासाठी १८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ६.१५ वाजता बाभई स्मशानभूमीत आणण्यात आले होते. अंतिम संस्कार करुन आटोपल्यावर मृत्यू दाखला कुठे मिळेल, याबाबत राव यांनी कर्तव्यावर हजर असलेले मृत्यू नोंदणी कारकूनाकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘मृत्यू दाखला मी काढून देऊ शकतो’, असे सांगून प्रत्येक दाखल्याच्या प्रतीसाठी १०० रुपये लागतील, असे सांगितले. यावर राव यांनी ५ प्रती पाहिजे, असे सांगून त्यांना ५०० रुपये दिले.
(हेही वाचा माहिम प्रसुतीगृहाला माजी नगरसेविका इंदुमती मांडगावकर यांचेच नाव? आरोग्य समितीचा शिक्कामोर्तब)
प्रत्येक प्रतीसाठी १०० रुपये घेतले
विशेष म्हणजे मृत्यू दाखल्याची पहिली प्रत मोफत मिळते. त्यानंतर प्रत्येक छायाप्रतीसाठी ६ रुपये आकारले जातात. पण तांबे यांनी प्रत्येक प्रतीसाठी १०० रुपये घेतल्याने शशांक राव यांनी महापालिकेच्या ट्विटर (@mybmc या समाजमाध्यमावर तक्रार केली. आर/मध्य विभाग अंतर्गत कार्यरत एका कर्मचाऱ्याने पैशांची मागणी करुन ते स्वीकारल्याबद्दल ही तक्रार होती. त्याची तातडीने दखल घेवून महानगरपालिकेचे उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) आणि कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी दिलेल्या दूरध्वनी आदेशानुसार आर/मध्य विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी बाभई स्मशानभूमीमध्ये जाऊन तक्रारीची शहानिशा केली. त्यावेळी त्यांना या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतोष तांबे यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडताना नितांत सचोटी राखली नाही, तसेच कर्तव्य परायणता ठेवली नाही. हे महानगरपालिका कर्मचाऱ्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य केले. त्यांचे कृत्य हे गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तणुकीचे असल्याने त्यांना प्राथमिक तथा खात्यांतर्गत सर्वंकष चौकशीसापेक्ष निलंबित करण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Join Our WhatsApp Community