लघु उद्योजकांना सुवर्णसंधी! उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार २०२१ साठी असा करा अर्ज

158

उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार, सन 2021 या वर्षासाठी सोमवार 28 फेब्रुवारी अखेरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे नांदेड जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. उद्योग संचालनालयाच्या वतीने सन 1984 पासून लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दरवर्षी जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योगांना पुरस्कार दिले जातात. सन 2006 पासून प्रथम व द्वितीय पुरस्कार अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपये रोख, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात येते.

( हेही वाचा : दिलासा! राज्यात एकाच दिवशी पन्नास हजार रुग्णांची कोरोनावर मात )

या अटी पूर्ण करणे आवश्यक

जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. अर्जाच्या वेळी, उद्योग घटक मागील तीन वर्षापूर्वी पासून उद्योग आधार व एमएसएमई डेटा बँक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. कमीतकमी मागील दोन वर्षापासून उत्पादन सुरु असावे. उद्योग घटकाने बँकेचे कर्ज घेतले असल्यास त्या कर्जाची नियमितपणे परतफेड केलेली असावी. थकबाकीदार असू नये. उद्योग घटकांना यापूर्वी कोणताही जिल्हा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळालेला नसावा. महिला व मागासवर्गीय उद्योजकांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा उद्योग केंद्राने विहीत केलेल्या नमुन्यात अर्ज करणे अनिवार्य आहे.

नांदेड जिल्ह्यातील लघु उद्योजकांनी सोमवार 28 फेब्रुवारी पूर्वी जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांच्याकडे विहीत नमुन्यात अर्ज करावेत अथवा अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र नांदेड यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.