प्रसारभारती विरुद्ध कर्मचारी अन् श्रोता! ‘एक राज्य एक केंद्र’ या विरोधात राज्य पातळीवर मोहीम सुरू

117

प्रत्येक केंद्राची अशी स्वतंत्र ओळख असते आणि त्यामुळे असंख्य श्रोत्यांना वेगळा अनुभव येत असतो. स्थानिक निवेदक, स्थानिक कलाकार, स्थानिक कार्यक्रम यातून आपल्या शहराची आणि शहरातल्या कलाकारांची तसंच परिसराची माहिती घरबसल्या देणारी ही वेगवेगळी आकाशवाणी केंद्र प्रसार भारतीच्या अखत्यारीत येतात. मुंबई, पुणे, नागपूर वगैरे केंद्रांवर अनेक वर्षांपासून हेच चित्र आहे.

आकाशवाणी हे केवळ एक रेडिओ केंद्र नसून ही एक सांस्कृतिक देवाण-घेवाण करणारी संस्था आहे, उत्तम उत्तम संस्कार करणारं एक माध्यम आहे, गुणांचा पुरस्कार करणारं एक केंद्र आहे. अनेक वर्षांपासून हे काम अव्याहतपणे सुरू होतं, पण आता त्याला मोठी खीळ बसणार असल्याची चर्चा सुरू आहे. कारण प्रसार भारतीची धोरणं खूप मोठ्या प्रमाणात बदलत आहेत. ‘एक राज्य एक केंद्र’ किंवा एकच मुख्य वाहिनी असं धोरण आता प्रसारभारती अंमलात आणत आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर आकाशवाणी मुंबई केंद्र ही प्रमुख वाहिनी म्हणून सगळ्या केंद्रांना जोडली जाणार आहे आणि प्रत्येक केंद्राचं स्वतंत्र नाव जाऊन ‘आकाशवाणी महाराष्ट्र’ या नावानं हळूहळू एकच केंद्र याकडे वाटचाल सुरू होत आहे. मात्र या निर्णयाला कर्मचारी अन् श्रोतावर्गांकडून विरोध होताना दिसतोय.

पुणे आकाशवाणीवर 1 फेब्रुवारीपासून दुपारच्या प्रसारणात आकाशवाणी महाराष्ट्र म्हणजेच मुंबई केंद्रावरून कार्यक्रम सहक्षेपित होणार आहेत. हा झाला पहिला टप्पा. यानंतर हळूहळू संपूर्ण दिवसभराचे कार्यक्रम सुद्धा फक्त आकाशवाणी महाराष्ट्र या नावाखाली सादर होणार आहेत. प्रत्येक केंद्राची स्वतःची म्हणून जी ओळख असते आणि कार्यक्रम असतात ते हळूहळू संपुष्टात येणार आहेत. आजवर आकाशवाणीने अनेक कलावंत घडवलेत हे सर्वज्ञात आहे. असं असताना सुद्धा आता हा एवढा मोठा बदल करून स्थानिक कलाकारांवर, कार्यक्रमांच्या वैविध्यावर आणि अर्थातच स्थानिक निवेदकांवर सुध्दा खूप मोठा अन्याय प्रसार भारती करत आहे. स्थानिक कार्यक्रमांमध्ये आरोग्य, पर्यावरण किंवा शेती विषयक असे कार्यक्रम, बालविभाग, संगीत विभाग, महिला विमाग असतात. ते राज्यपातळीवर एकाच पद्धतीने सादर होणार, त्यातून काय फायदा किंवा साध्य होणार? प्रसार भारतीने यासंबंधी कोणत्याही केंद्रांना विश्वासात न घेता ती केंद्रं (मुख्य वाहिनी) बंद पाडण्याचं काम आरंभलं आहे.

प्रसार भारतीने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी

याला सर्व स्तरातून विरोध होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या सर्व निवेदकांपासून ते आकाशवाणीत विविध विभागात काम करणारे कर्मचारी (प्रोडक्शन असिस्टंट, किंवा ड्युटी ऑफिसर इ..) या सर्वांनी तसंच आकाशवाणीवर प्रेम करणा-या असंख्य श्रोत्यांनी या बदलाला विरोध दर्शवला आहे. तथापि हे थांबवण्यासाठी खूप मोठ्या साह्याची गरज नक्कीच आहे. भारत सरकारने आणि प्रसारण मंत्र्यांनी देखील यात गांभीर्याने लक्ष घालून या कृतीवर आळा घालायला हवा. प्रसार भारती ने त्यांचं पुढच्या दहा वर्षांचं धोरण सुनिश्चित करणं त्यासाठी प्रत्येक केंद्राला विश्वासात घेणं आणि प्रत्येक केंद्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. या नवीन धोरणामुळे हंगामी कर्मचा-यांवर (उद्घोषक, निर्मिती सहाय्यक, ड्युटी ऑफिसर) सर्वाधिक अन्याय होणार आहे. सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून प्रसार भारती ने हा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

(हेही वाचा – BUDGET 2022 : बजेट म्हणजे काय? बजेट कोण तयार करतं? वाचा कहाणी)

१ फेब्रुवारी २०२२ पासून महाराष्ट्रातल्या रेडियो च्या सर्व प्रायमरी चॅनल/ (प्राथमिक) केंद्रावरून, सकाळी ११ ते दुपारी ३.२० या वेळात मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित होणार आहेत असे कळले. या अनपेक्षित व अनाकलनीय निर्णयामुळे सर्व केंद्रांवरील असायनी/नैमित्तिक उदघोषकांमधे व कार्यक्रम निर्मिती प्रक्रियेशी संबंधित अन्य नैमित्तिक स्वरूपाच्या सहाय्यकांमधे गोंधळाचे व नाराजीचे वातावरण आहे.  आज प्रसार भारतीने विकसित केलेल्या newsonair या mobile app मुळे जगभरातले श्रोते पुन्हा एकदा आनंदाने आकाशवाणीशी जोडले गेले आहेत. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात आपल्या प्रदेशातली निवेदने त्या भाषाशैलीतील कार्यक्रम ऐकून सुखावत आहेत. या पार्श्‍वभूमीवर तर हा निर्णय अगदीच असमर्थनीय असल्याचे बोलले जात आहे. एकाच ठिकाणचा उद्घोषक व कलाकार, विषय तज्ज्ञ यांच्याकडून हे प्रादेशिक वैविध्य जपले जाणे अशक्य वाटते. भाषा संवर्धनाच्या दृष्टीनेही असे वैविध्य जपण्याला अनन्यसाधारण महत्व असल्याचे अनेक भाषा तज्ज्ञांकडून नमूद होत असताना हा निर्णय क्लेशकारक असल्याचे अनेकांचे मत आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.