महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे 60 एकरातील उसाचे फड आगीच्या भक्षस्थानी!

107

लातूर तालुक्यातील भिसे वाघोली शिवारातील शॉर्टसर्किटने सुमारे ६० ते ७० एकरातील ऊस जळाल्याची घटना घडली आहे. या भागात आजूबाजूला ऊसाचे फड असल्याने, २० शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महावितरणच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना वाढत असल्याचा, आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे, स्थानिकांचे म्हणणे आहे.

जीवित हानी झाली नाही

मिळालेल्या माहितीनुसार, भिसे वाघोली येथील ऊस तोडणीला आला होता, तेव्हा ही आग रविवारी दुपारच्या दरम्यान लागली. या घटनेची माहिती मिळताच विलास साखर कारखान्याच्या अग्निशमन पथकाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने, आग आटोक्यात आणण्यात अपयश आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली, तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही 

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सांगितले की, मांजरा पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. या भागातील शेतकऱ्यांचे ऊस हेच मुख्य पीक आहे. यावरच वर्षभराचे आर्थिक नियोजन असते मात्र, अवघ्या काही वेळातच सुमारे ६० एकरातील ऊस जळून खाक झाला. असे असले तरी, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. मांजरा आणि विकास सहकारी साखर कारखान्याच्या हद्दीतील हे ऊसाचे क्षेत्र आहे. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून निघणार नाही, पण जळीत ऊसाचीदेखील तोड मांजरा साखर कारखाना करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल. शिवाय महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन, लवकरात लवकर बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले आहे.

( हेही वाचा: जर वाईन शेतक-यांच्या हिताची, तर गांजाची शेती करण्यासाठी परवानगी द्या! )

नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना

या घटनेनंतर, देशमुख यांनी महसूल आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. आगीत केवळ ऊसाचेच नाही, तर इतर शेती साहित्याचेही नुकसान झाले आहे. ठिबक सिंचनाचे संचही जळून खाक झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती महावितरण आणि महसूलच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार पंचनामे करून, आता मदतीसाठीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.