सिंधुदुर्ग न्यायालयात सोमवारी भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनवाणी पूर्ण झाली. आमदार नितेश राणे नियमित जामीन अर्जावरील सुनावणीसाठी जिल्हा न्यायलया समोर हजर झाले होते. यावेळी राणेंच्या जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला. दरम्यान, आजची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय उद्या दुपारी ३ वाजता निर्णय देईल अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. त्यामुळे नितेश राणे यांना अटक होणार की जामीन मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
नितेश राणेंची अटक अत्यावश्यक
विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी नितेश राणे यांना अटक करणं का आवश्यक आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच राणे हे न्यायालयाला शरण आले आहेत. यावेळी प्रदीप घरत म्हणाले, नितेश राणे नॉट रिचेबल होते हा दावा ते खोडून काढू शकले नाहीत. न्यायालयासमोर येईपर्यंत ते नॉट रिचेबल होते. सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेपर्यंत ते समोर आले नव्हते. अन्यथा पोलीस त्यांना कधीही अटक करु शकत होते. या तपासात प्रगती होण्यासाठी नितेश राणेंची अटक अत्यावश्यक आहे.
(हेही वाचा – ज्याच्या आवाहनानंतर शेकडो विद्यार्थी झाले आक्रमक, कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ?)
सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर झाले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी नितेश राणे यांचा अटकपर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करावा असे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर झाले. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय उद्या दुपारी ३ वाजता निकाल सुनावणार आहे.
Join Our WhatsApp Community