‘नाय वरन भात लोन्चा…’ सेन्सॉर बोर्डाच्या अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याची याचिकाकर्त्यांची मागणी!

130

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावर आधारित ‘नाय वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटाच्या विरोधातील याचिकेच्या सुनावणीचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे. ३१ जानेवारी या दिवशी न्यायमूर्ती एन्.एस्. शेख यांच्यापुढे ही सुनावणी झाली. या चित्रपटात अल्पवयीन मुलांना हिंसक आणि अश्लील दाखवल्यामुळे पोस्को कायद्याचे उल्लंघन झाले आहे. याविषयी पोलिसांना सूचित न करणारे चित्रपट परीनिरीक्षण मंडळाचे संबंधित अधिकारीही दोषी आहेत, त्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्यांनी केली आहे.

गुन्हा नोंदवण्याची मागणी

या चित्रपटाच्या विरोधात भारतीय स्त्री शक्ती संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा आणि मुंबई अध्यक्षा सीमा देशपांडे यांनी न्यायालयात याचिका केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अधिवक्ता आशिष चव्हाण आणि अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी काम पाहिले. या  चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर, निर्माते नरेंद्र हिरावत आणि श्रेयस हिरावत, सहनिर्माते विजय शिंदे यांसह संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.

( हेही वाचा : ‘इन्स्टा क्वीन’ला अश्लील व्हिडिओ बनवणं पडलं महागात, तिघांना अटक )

हे समाजासाठी हानीकारक

या विषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीशी बोलताना याचिकाकर्त्या सीमा देशपांडे म्हणाल्या, ‘‘या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ सामाजिक माध्यमांद्वारे सर्वत्र पोचला आहे. हा चित्रपट पौंढांसाठी असला तरी सद्यस्थिती बहुतांश अल्पवयीन मुलांकडे ‘स्मार्टफोन’ आहेत. त्याद्वारे या चित्रपटाचा ‘ट्रेलर’  अल्पवयीन मुलांपर्यंतही पोचला आहे. आधीच समाजामध्ये बलात्काराच्या घटना वाढत असतांना अशा चित्रपटांमुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढण्याचा धोका आहे. अल्पवयीन मुलांना अश्लील आणि हिंसक कृत्ये करतांना दाखवणे, हे समाजासाठी हानीकारक आहे.’’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.