जेव्हा तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करत असता, तेव्हा जर तुम्हाला पुरस्कार मिळाला, तर तुम्ही प्रोत्साहित होता. पूर्वी असे घडत नव्हते पुरस्कार मिळायला उशीर व्हायचा. त्यामुळे ब-याचदा खेळाडूंचे मनोबल खचून जायचे. आता तसं होत नाही. सरकार खेळाला प्रोत्साहन देत आहे. तुम्ही कोणतीही कामगिरी केली की, तर सरकार तुमच्या कामाची तत्काळ दखल घेते. आता वेळेवर पुरस्कार दिले जात आहेत. नीरज चोप्रा यांना सरकारने लगेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. अशा रितीने पुरस्कार वेळेत दिल्याने, खेळाडूंचं मनोबल वाढते आणि ते अधिक उत्तम कामगिरी करतात. असे महत्त्वपूर्ण वक्तव्य भारताचे माजी बिलियर्ड्स आणि स्नूकर वर्ल्ड चॅम्पियन तसेच, अर्जून पुरस्कार विजेते अशोक शांडिल्य यांनी केले.
सोमवार, 31 जानेवारी रोजी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील विविध पैलू उलगडून सांगितले. तसेच, क्रीडा क्षेत्रात वर्तंमान काळात झालेल्या बदलाबद्दलही सविस्तरपणे सांगितले. आताच्या पिढीला या खेळाबद्दल त्यांनी मार्गदर्शनही केलं.
लहाणपणीच स्नूकरविषयी आकर्षण
शाळेपासूनच मला स्नूकर या खेळाविषयी आकर्षण निर्माण झालं, नंतर रेल्वे इन्स्टिट्यूटला गेल्यावर, जिल्हास्तरावर माझी निवड झाली. पुढे देशाचं प्रतिनिधित्व करता आलं. त्यानंतर हळूहळू या क्रीडा प्रकारात प्रवास सुरु झाला. रोज 8-9 तासांचा सराव करत होतो. दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकलो, असं अशोक शांडिल्य यांनी आपल्या प्रवासाबद्दल सांगितलं.
…तरच खेळाडू चॅम्पियन ठरतो
गेली 30-35 वर्षे मी खेळतोय. जर कोणी माझ्याकडून शिकत असेल, तर त्याला 30-35 वर्षांचा अनुभव सोप्या पद्धतीने मिळतो. हा अनुभव आणि आम्ही करत असलेलं मार्गदर्शन त्याला फक्त योग्य पद्धतीने आत्मसात करण्याची गरज आहे. एकदा का त्याने हे केलं की, त्याला 30-35 वर्षे खेळून अनुभव घेण्याची गरज नसते. ज्याला आम्ही प्रशिक्षक म्हणून शिकवतो त्याच्यात खेळण्याची जिद्द असायला हवी, तरच तो खेळाडू चॅम्पियन बनू शकतो.
मेडल मागे अथक मेहनत
लोकांना दिसताना फक्त मेडल दिसतं, पण त्यामागची मेहनत कोणाला माहिती नसते. पी.व्ही. सिंधू जिच्या कुटुंबासोबत माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तिची मेहनत मी माझ्या डोळ्याने पाहिली आहे. आता पी.व्ही. सिंधूला सगळे ओळखतात, पण त्यामागची तिची मेहनत किती वर्षांची आहे, हे मात्र कोणाला माहिती नसतं, त्या मुलीने प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक खेळाडू मेडल जिंकण्यासाठी अथक मेहनत घेत असतो.
आधी शिक्षण पूर्ण करा
मी खेळात पुढे गेल्यानंतर, मला माझं शिक्षण पूर्ण करता आलं नाही, कारण त्यासाठी तितका वेळच मिळाला नाही. पण मी माझ्याकडे येणा-या मुलांना कायम सांगतो की, आधी शिक्षण पूर्ण करा, ते अतिशय महत्त्वाचं आहे. खेळात उत्तम कामगिरी करु शकला नाहीत, तर तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या जोरावर काहीतरी कमवू शकता. त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण करण्यावर भर द्या, असं शांडिल्य यांनी स्पष्ट केलं.
( हेही वाचा: Budget 2022 : काय स्वस्त, काय महाग? वाचा…)
कायम शिकत राहा
प्रत्येकवेळी काहीतरी नवीन शिकण्याचा मानस असावा, वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकलेली मंडळीही कधी बोलणार नाहीत की, मला सगळ येते. ज्यादिवशी ते असं बोलतील त्यादिवशी ते संपतील, त्यामुळे आयुष्यात लर्नींग प्रोसेस थांबता कामा नये. सरावातूनच नवं शिकता येतं, असा संदेश शांडिल्य यांनी यावेळी दिला.
गुरुचं महत्त्व अनन्य साधारण
शांडिल्य यांनी सध्याच्या गुरु -शिष्यांच्या नात्यावर अचूक बोट ठेवलं आहे. ते म्हणाले की, शिष्यासाठी गुरु म्हणजे लिवींग गाॅड असतो. आमच्या वेळी गुरुंसाठी एक वेगळाच मानसम्मान होता. गुरुचं महत्त्व हे अनन्य साधारण आहे. मायकल फरेरा आणि गीत सेठी यांना पाहिलं, तर आम्हाला वाटायचं की, साक्षात देव खाली उतरला आहे. पण आता मात्र, तशी परिस्थिती नाही. आताची मुलं बाजूने गेली, तरी ओळख दाखवत नाहीत, असं ते यावेळी म्हणाले.
मानसिक संतुलन गरजेचे
या खेळात शारीरिकदृष्ट्या जितकं फीट राहणं महत्त्वाचं आहे, त्याहून जास्त मानसिकदृष्ट्या बळकट असणं महत्त्वाचं आहे. आता या खेळात प्रॅक्टिस करण्यासाठी मर्यादा आल्या आहेत. आता फक्त एका दिवसात 6 तासच सराव करण्याची परवानगी आहे. तुम्ही पाच आणि सहा तासच सराव करता, पण त्यासाठी तुम्हाला 20 तासांची मेंटल हेल्थ महत्त्वाची असते. या खेळात तुम्ही मानसिकदृष्टया जास्त तयार असणं आवश्यक आहे. असं शांडिल्य यांनी स्पष्ट केलं.
( हेही वाचा :व्यावसायिक गॅस सिलिंडर 91.50 रुपयांनी स्वस्त )
आत्मिक ऊर्जा महत्त्वाची
हा एकच असा खेळ आहे जिथे कोणत्याच वयाची अट नाही. 60 वय झालं, तरी हा खेळ खेळला जाऊ शकतो. त्यामुळे वय हा फक्त एक आकडा आहे, या खेळात आत्मिक ऊर्जा महत्त्वाची आहे. आपल्या चुका नेहमी लक्षात ठेवून, त्या पुन्हा न करता खेळत राहिलो, तर जिंकण्याची संधी अधिक असते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रशिक्षक आणि प्रशिक्षणामध्ये हस्तक्षेप करु नका
आताचे पालक आपल्या मुलांना क्रीडा क्षेत्रात पाठवतात. आधी तस नव्हतं, आता लोक खेळाला अधिक प्राधान्य देत आहेत. आपल्या मुलांना एका चांगल्या प्रशिक्षकाकडे सोपवल्यानंतर, पालकांनी प्रशिक्षक आणि प्रशिक्षणामध्ये ढवळाढवळ करु नये. नाहीतर, मुलांची कोंडी होते, तसेच आधीच त्यांच्यावर जिंकण्याचा तणाव असतो, पालक समोर बसल्यानंतर त्यांचा ताण अधिक वाढतो. त्यामुळे पालकांनी हस्तक्षेप थांबवावा, असं शांडिल्य यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ : आयकर आकारणीत काहीही बदल नाही! )
आता खेळाला अधिक महत्त्व दिलं जातंय
बिलियट्स हा खेळ ऑल्म्पिकमध्ये आल्यानंतर, भारताचं गोल्ड मेडल पक्क समजा. एवढी भारतात क्षमता आहे. भारतात आता खेळाच्यादृष्टीने अनेक बदल झाले आहेत. आता आधीच पैसे दिले जातात. खेळासाठी लागणा-या साहित्याचा वेळेवर पुरवठा होतो.आधीसारखी आता वाट बघावी लागत नाही. येणा-या पिढीला आता अधिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही. आता सरकारची खेळाच्यादृष्टीने मानिसकता बदलली आहे. सरकार क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत आहे. नुकतेच भारताने ऑल्म्पिकमध्ये गोल्ड मेडल आणलं, कारण खेळाडूंना आता प्रोत्साहन दिलं जातयं. त्यामुळे खेळाला अधिक महत्त्व प्राप्त झाल्याचं शांडिल्य म्हणाले.
Join Our WhatsApp Community