मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवणारे रविंद्र वायकर हे जोगेश्वरीचे आमदार बनले तर राहुल शेवाळे हे दुसऱ्यांदा दक्षिण मध्य मुंबईतून खासदार बनले. मात्र, या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवत आमदार व खासदारपद विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मिळवता आलेले नसले तरी वेगळ्या कारणाने जाधव यांनी या दोघांच्या यादीत जावून बसवण्याचा मान मिळवला आहे. आजवर जो मान रविंद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांना मिळाला होता, तोच मान आता यशवंत जाधव यांना मिळणार असून असा मान पटकावणारे यशवंत जाधव हे तिसरे स्थायी समिती अध्यक्ष ठरणार आहेत.
( हेही वाचा : मुंबईच्या मालमत्ता कर वसुलीवर निवडणुकीचे सावट, तरीही… )
३ फेब्रुवारीला अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्षपद सन २००६ ते सन २०१० विदयमान रविंद्र वायकर यांनी भूषवले होते, तर विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांनी सन २०१० ते सन २०१४ या कालावधीत हे अध्यक्षपद भूषवले होते. तर विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे सन २०१८ ते आजमितीस हे पद भूषवत आहेत. अध्यक्षपद भूषवण्याची बरोबरी करणाऱ्या जाधव यांनी खरी किमया साधली आहे ती महापालिकेचा चौथ्यांदा अर्थसंकल्प स्वीकारण्याची. आजवर चार वेळा अर्थसंकल्प स्वीकारण्याचा मान रविंद्र वायकर आणि राहुल शेवाळे यांनी मिळवला होता. या दोन्ही स्थायी समिती अध्यक्षांच्या बरोबरीने जाधव हेही येत्या ३ फेब्रुवारीला अर्थसंकल्प स्वीकारण्याची किमया साधणार आहे. एरव्ही सार्वत्रिक निवडणुकीमुळे अर्थसंकल्प केवळ सादर केला जातो, आणि नवीन महापालिका स्थापन झाल्यानंतर पुन्हा नवीन अध्यक्षांना तो सादर केला जातो. सन २०१२-१३अर्थसंकल्प तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी स्वीकारला होता.
परंतु आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प सिल करून केवळ सादर जाणार नसून तो आयुक्त मांडणार आहेत. त्यामुळे यशवंत जाधव यांच्यासमोर हाही चौथा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे चौथ्यांदा अर्थसंकल्प स्वीकारताना दिसणार आहेत.
( हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये भाजप नगरसेवकांना बनवले अस्थिर! )
अर्थसंकल्पाचे सादरीकरण ऑनलाईन
मुंबई महापालिकेच्या सभा या प्रत्यक्ष घेण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे परिपत्रक राज्य शासनाने पारित न झाल्याने येत्या गुरुवारी ३ फेब्रुवारी रोजी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे सन २०२२-२३चा अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे अर्थसंकल्प स्थायी समितीच्या बैठकीत ऑनलाईन मांडले जाणार आहे. महापालिका सभागृहात स्थायी समिती अध्यक्ष, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, महापालिका चिटणीस संगीता शर्मा, प्रमुख लेखापाल (वित्त), प्रमुख लेखापाल(पापुमनी)व प्रमुख लेखापाल(अर्थसंकल्प) यांच्यासह अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) आदीच प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. तर उर्वरीत सर्व गटनेते व समिती सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त ऑनलाईन सहभागी होणार आहेत. या अर्थसंकल्पाचे प्रक्षेपण फेसबूक, यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातू जनतेला तसेच माध्यमांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community