माघी गणेशोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ’ला स्वराभिषेक, असा असणार कार्यक्रम

120

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच शुक्रवारी ४ फेब्रुवारी रोजी बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.

असा असणार कार्यक्रम

शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार आहे. त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी हे श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण करणार आहेत. स्वराभिषेकातून विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी भक्तांना यानिमित्ताने मिळणार आहे. तसेच सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होईल.

(हेही वाचा – माघी गणेश जयंतीला अशी करा बाप्पाची उपासना!)

मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई

मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगलआरती होईल. नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत जाणार असून तेथे पादुका पूजन होईल. तेथून गणपती मंदिरात नगरप्रदक्षिणेची सांगता होईल. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल. रात्री ११ ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिराला आकर्षक सजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.