अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीवर विकास कामे कशी पूर्ण होणार? भाजपची अर्थसंकल्पावर टीका

123

आज सादर केलेला मुंबई पालिकेचा अर्थसंकल्प सुजलेला असून, उत्पन्नात प्रत्यक्षात वाढ करण्यासाठी कुठल्याही उपाययोजनांबाबत उल्लेख न करता अंतर्गत कर्ज आणि राखीव निधीतून तब्बल ६९ टक्के उचल करून, विकास कामे कशी पूर्ण होणार असा सवाल भाजपचे महापालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प राखीव निधीतून उचल करून मुंबई पालिकेला दिवाळखोरीकडे नेणारा असून, सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेला आगामी निवडणुकीत मुंबईकर जागा दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा टोलाही शिंदे यांनी यावेळी लगावला.

शिंदेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष वेधले

उर्दू भवन बांधणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून  मराठी भाषा भवन, वारकरी भवन, डबावाला भवन याचा विसर पडला आहे. अर्थसंकल्पात जकातीपोटी  नुकसान भरपाई ११ हजार ४२९ कोटी गृहीत धरलेली आहे. आज पाच वर्षांनंतर ही नुकसान भरपाई महापालिकेला यापुढेही  मिळणार आहे का? राज्य शासनाने तशी ग्वाही दिली आहे का?  या प्रश्नाचे कुठलेही उत्तर या अर्थसंकल्पात मिळत नाही. सर्वसामान्य मुंबईकरांची या अर्थसंकल्पाकडून घोर निराशा झाली आहे. केवळ हा चुनावी जुमला संकल्प असून, कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची परंपरा यावेळीही कायम सुरू ठेवली आहे.  शहरातील अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. सागरी किनारा मार्ग प्रकल्प  रखडला आहे, तर भांडवली तरतुदींपैकी केवळ ४० % खर्च झाला असून गतवर्षीच्या अर्थसंकल्पातील अनेक तरतुदी कागदावरच राहिल्या आहेत. गोरेगांव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प गेली चार वर्षे रखडला आहे. वेगवेगळ्या प्रकल्पातील निधीचा विनियोग होत नसल्याचे, निदर्शनास आले आहे. रस्ता रुंदीकरण आणि मलनिस्सारण प्रकल्पालाही गती मिळालेली नाही अशा विविध मुद्द्यांवरही गटनेते शिंदे यांनी यावेळी लक्ष वेधले.

( हेही वाचा: विकास नियोजन खात्याच्या उत्पन्नात १२,७५० कोटींची वाढ )

बोलाचा भात आणि बोलाची कढी-शिरसाट

भांडवली विकासकामांचे कागदी घोडे नाचवणारा हा अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि  बोलाचीच कढी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केली. बेस्टच्या अर्थसंकल्पाला ६ हजार ८०० कोटींचा अनुदान देण्याचा ठराव स्थायी समिती पंधरा दिवसापूर्वी मंजूर करते; पण या अर्थसंकल्पात केवळ ८०० कोटी देण्याचे सूतोवाच आयुक्त करतात! म्हणजे बेस्टला खड्ड्यात घालणारा हा अर्थसंकल्प असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.