मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आकारला जाणारा जकात कर रद्द होऊन त्याऐवजी वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी आकारला जातो. त्यामुळे जकात कर वसूल करणारे नाके बंद करावे लागले असून या जकात नाक्यांच्या जागांवर रुग्णालय उभारण्याची मागणी होत असताना या जकात नाक्यांच्या जागांवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र उभारण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मानखुर्द आणि दहिसरमधील जकात नाक्यांचा विकास करण्यात येणार आहे.
( हेही वाचा : मुंबई महापालिकेच्या सुरक्षित शाळा )
मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जकात नाक्यांच्या मोक्यांच्या जागांवर परिवहन आणि व्यावसायिक केंद्र उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी आपल्या अर्थसंकल्पीय निवेदनात स्पष्ट केले. त्याअनुषंगाने सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर मानखुर्द जकात नाका आणि दहिसर जकात नाका येथील जागेचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
जकात नाक्यांचा विकास
या जकात नाक्याच्या जागेवर सर्वसमावेशक बस टर्मिनस उभारुन ते शहरातील इतर वाहतूक व्यवस्थेसोबत जोडणे हा या प्रस्तावाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच उर्वरीत जागेचा शहरातील नागरीकांकरीता व्यावसायिक व मनोरंजनाच्या सुविधा पुरविण्यासाठी प्रभावी वापर केला जाईल, जेणेकरून मुंबई महानगरपालिकेला उत्पन्नही प्राप्त होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. याकरीता या कामांशी निगडीत विविध बाबींच्या अनुषंगाने सर्व तज्ञ सेवा पुरविण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची नियुक्ती करण्याकरीता विनंती प्रस्ताव मागवून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता सल्लागारांची नियुक्ती करण्याचे काम लवकरच पूर्ण होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
( हेही वाचा : कचऱ्याच्या करातून करदात्यांच्या खिशात हात! )
जकात नाक्यांच्या जागांवर बस टर्मिनस उभारण्याची मागणी भाजपचे तत्कालीन गटनेते व खासदार मनोज कोटक यांनी चार वर्षांपूर्वी अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे केली होती. परंतु चार वर्षांनी प्रशासनाने आता या मागणीचा विचार केल्याचे दिसून येत आहे.
Join Our WhatsApp Community