मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना वारंवार इशारा देऊनही त्यांनी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची बदनामी चालूच ठेवली आहे. त्यामुळे आता न्यायालयाने नवाब मलिक यांना ही बदनामी थांबवण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे.
माफी मागूनही वारंवार बदनामी
ज्ञानदेव वानखेडे यांनी सांगितले की, बदनामी केल्याने मागच्या महिन्यात न्यायालयात माफीनामा देऊनही नवाब मलिक यांनी 2021 मध्ये 28 डिसेंबरला तसेच जानेवारी 1 आणि जानेवारी 2 या दिवशीही माझ्यविषयी बदनामीकारक वक्तव्य केले. 10 डिसेंबर रोजी केलेल्या बदनामीकारक वक्तव्यानंतर नवाब मलिक यांनी न्यायालयात कायद्याचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याच्या अंतर्गत बिनशर्त माफी मागितली होती. तसेच यापुढे वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करणार नाही, असं मलिकांनी सांगितलं होतं. ज्ञानदेव वानखेडे यांनी न्यायालयात सांगितले की, मलिक यांनी माफी मागूनही ते वारंवार माझ्याविषयी बदनामकारक वक्तव्य करतात. तसेच प्रत्येक वेळी न्यायालयात सुनावणीला येण्यापूर्वी ते माझ्या विरोधात ट्विट करुन येतात, असं वानखेडे म्हणाले.
( हेही वाचा: मालेगाव बाॅम्बस्फोट 2008 : आतापर्यंत तब्बल 17 साक्षीदारांनी फिरवली साक्ष! )
काय साध्य करण्याचा प्रयत्न करताय
मलिकांच्या बाजूने सांगण्यात आले की, त्यांनी केलेली विधाने ही न्यायालयाने आधी दिलेल्या आदेशाच्या सवलतीत येतात. यावर न्यायमूर्ती काथावाला यांनी सप्ष्ट केलं की, असं असेल तर, आम्ही सवलती काढून घेऊ. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तुम्ही ज्ञानदेव वानखेडे यांची बदनामी करत आहात. तुम्ही काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहात? यापुढे हे चालणार नाही, असं न्यायालयाने मलिकांच्या वकिलांना सांगितलं. न्यायालयाने मलिक यांना शनिवारपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. पुढील सुनावणी ७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.
Join Our WhatsApp Community