ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य सरकारच्या सुपर मार्केटमधून वाईन विक्री करण्याच्या निर्णयाच्या विरोधात परवानगी नसतानाही मोर्चा काढला. त्यानंतर बंडातात्या यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केले. याप्रकरणी आता राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहे. पोलीस शुक्रवारी सकाळी बंडातात्या कराडकर यांच्या घरावर पोहोचले. त्यांची चौकशी सुरु केली आहे.
माझा कुणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. अनवधानाने बोललो आहे. ज्यांच्या विषयी मी बोललो, त्यांच्याविषयी माझा आकस नाही. सरकारने वाइनबाबत जी भूमिका घेतली ती चुकीची आहे, यावर आपण ठाम आहे.
– कीर्तनकार बंडातात्या कराडकर
महिला आयोगाने पाठवली नोटीस
राज्य महिला आयोगानेही या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचे अशा प्रकारचे वक्तव्य खपवून घेणार नाही, असा इशारा देत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बंडातात्या यांना नोटीस पाठवून २४ तासांत खुलासा करण्याचा आदेश दिला आहे. तसेच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला.
(हेही वाचा “…मुख्यमंत्री महाविकास आघाडीत आल्यानं बिघडले”)
पोलीस कारवाई होण्याची शक्यता
त्यामुळे शुक्रवारी सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचले, साताऱ्यातल्या पिंजर येथील बंडातात्या यांच्या मठात सातारा पोलीस यांनी त्यांची चौकशी सुरु केली, त्यामुळे आता पोलीस बंडातात्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. पोलीस त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर करतील, अशी शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community