मुंबईतील स्मशानभूमी पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टिकोनातून पीएनजी वर आधारित बनवण्यात येत असल्या तरी या बंदिस्त जागेतील चितांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांचा कल कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने आता पर्यावरण पूरक आणि पारंपारिक चिता बनवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेच्या वतीने पर्यावरण पूरक लाकडी चिता स्मशानभूमीत बनवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : बेस्टला ८०० कोटींचे अर्थसहाय्य देणार! )
७ स्मशानभूमींचे काम पूर्ण
मुंबईत ७२ हिंदू, ७० मुस्लिम, ५१ ख्रिश्चन आणि ८ इतर स्मशानभूमी असून या सर्व स्मशानभूमींची देखभाल मुंबई महापालिकेच्या माध्यमातून केली जाते. वायु प्रदूषण कमी करण्याकरीता हिंदू पारंपारिक स्मशानभूमींचे पीएनजी आधारीत स्मशानभूमीत रुपांतर केले जात आहे. पहिल्या टप्यात, ७ स्मशानभूमींचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
मानवी मृतदेहांच्या दहनाकरिता मुंबई महानगरपालिकेने विद्युत तथा पीएनजी भट्टया उभारल्या असल्या तरी त्यांची रचना बंदिस्त स्वरुपाची असल्याने सर्वसाधारणपणे नागरिकांकडून प्राधान्य दिले जात नाही. नागरिकांकडून शक्यतो पारंपारिक चितांचा वापर होत असल्याने आसपासच्या परिसरात प्रदूषण होते. त्यामुळे आता हरित भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याकरिता ‘पर्यावरणपूरक लाकडी चिता प्रणाली’ उभारण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने ‘ब्रिकेट’ चा पुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात गरीब, श्रीमंत वर्गाचे विभाजन )
सन २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मशानभूमीकरता अर्थसंकल्पीय तरतूद
- स्मशानभूमींची दर्जोन्नती: ८६.७९ कोटी रुपये
- स्मशानभूमींचे सौंदर्यीकरण आणि देखभाल: ५ कोटी रुपये
- पर्यवारण पूरक लाकडी चिता उभारणी : ४ कोटी रुपये