माहिम समुद्र किनारी झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना नागपूर येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे ट्रॅफिक वॉर्डन असून या हत्याकांडात तरुणाच्या प्रेयसीचा देखील सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले असून लवकरच तिला देखील अटक होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही हत्या ब्लॅकमेलिंगच्या वादातूनच झाल्याचे तपासात समोर आले आहे.
( हेही वाचा : पीएनजीच्या स्मशानभूमीकडे लोकांची पाठ, पर्यावरणपूरक लाकडी चिता उभारणार!)
हल्ला केल्याचा बनाव रचला
कमरुद्दीन खान उर्फ कम्मू (२१), बालकिशन गुप्ता (२३) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून मृत तरुणाची प्रेयसी ही १८ वर्षाची असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. मोहम्मद वसीम याची या तिघांनी मिळून माहिमच्या समुद्र किनाऱ्यावर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास हत्या करण्यात आली होती, त्यानंतर प्रेयसीने स्वतःच्या गळ्यावर वार करून लुटीच्या उद्देशाने दोघांनी आमच्यावर हल्ला केल्याचा बनाव रचला होता.
( हेही वाचा : माहिमच्या समुद्र किनारी प्रेमीयुगलावर हल्ला, तरुणाचा मृत्यू )
तिघांनी केली हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कमरुद्दीन खान उर्फ कम्मू, बालकिशन गुप्ता हे दोघे घाटकोपर छेडा नगर जंक्शन या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डनचे काम करीत होते. गोवंडी शिवाजी नगर येथे राहणाऱ्या या दोन आरोपींच्या घराजवळ मृत तरुण मोहम्मद वसीम आणि त्याची प्रेयसी राहत होती. कमरुद्दीन हा समलिंगी असून त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ मोहम्मद वसीम याच्या मोबाईल मध्ये होते. त्या व्हिडीओच्या अनुषंगाने वसीम हा कामरुद्दीन याला ब्लॅकमेल करून मागील काही महिन्यांपासून पैसे उकळत होता या कारणातून मोहम्मद वसीम याची हत्या करण्याचा कट कमरुद्दीन आणि त्याच्या मित्र बालकिशन यांनी आखला. या दोघांनी या कटात वसीम याच्या प्रेयसीला सामील करून घेतले होते. वसीम प्रेयसीला मारहाण आणि त्रास देत असल्यामुळे ती देखील त्याच्या वागण्याला कंटाळली होती यामुळे अखेर या तिघांनी मंगळवारी रात्री मोहम्मद वसीम याची माहिम समुद्र किनारी हत्या केली.
Join Our WhatsApp Community