विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याचे सर्व सोशल अकाऊंट बंद करण्यासाठी मुंबई पोलिसाकडून प्रयत्न सुरू आहे, या संबंधित सोशल मीडियाला पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंदुस्थानी भाऊला न्यायालयाने शुक्रवारी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली असून आज शनिवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. शुक्रवारी विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ याला चौकशीसाठी बीकेसी येथील सायबर सेलच्या कार्यालयात आणण्यात आले होते. सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे सर्व सोशल अकाऊंट तपासत असताना त्याने केलेले अर्वाच्य भाषेतील शिवीगाळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य बाबत चौकशी केली. तसेच त्याच्याकडे त्याचे इतर सोशल अकाऊंटचे पासवर्ड विचारले असता मला लक्षात नाही, असे तो पोलिसांना उत्तरे देत आहे.
… म्हणून पोलिसांकडून प्रयत्न सुरू
हिंदुस्थानी भाऊ तपासात सहकार्य करीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे असून भविष्यात तो जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा तो सोशल मीडियावरून चिथावणीखोर भाषणे तसेच अर्वाच्य भाषा वापरून व्हिडीओ व्हायरल करण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्याचे सर्व सोशल अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
(हेही वाचा – मार्चपर्यंत सतर्कता बाळगा! पण का? वाचा सविस्तर)
हिंदुस्तानी भाऊ सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत
यासाठी मुंबई पोलिसांकडून संबंधित सोशल मीडियाला पत्रव्यवहार केला जाणार असून हे वादग्रस्त खाते बंद करण्याची विनंती केली जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सोशल मीडियावर चिथावणी देऊन विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ याला काही दिवसांपूर्वी धारावी पोलिसाकडून अटक करण्यात आली होती. हिंदुस्तानी भाऊ हा सध्या मुंबई पोलिसांच्या कोठडीत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून आज त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होण्याची शक्यता आहे.
कोण आहे हा हिंदुस्थानी भाऊ?
- या हिंदुस्तानी भाऊचे नाव विकास फाटक असे आहे. या हिंदुस्तानी भाऊने विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप आहे. हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसच्या सीझन 13 मध्येही दिसला होता.
- बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तो अनेकदा चर्चेत राहिलाय.
- रुको जरा, सबर करो… या डायलॉगमुळेच हिंदुस्थानी भाऊ प्रसिद्धीझोतात आला.
- यूट्यूबवर प्रसिद्ध होण्याआधी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक एक पत्रकार होता.
- टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विकास फाटक मुंबईमधील एका स्थानिक वर्तमानपत्रात क्राईम रिपोर्टर होता. क्राईम रिपोर्टिंगसाठी 2011 मध्ये विकास फाटकला पुरस्कारही मिळाला आहे.
- कोरोना नियम मोडल्यामुळे मुंबई पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊला बेड्याही ठोकल्या होत्या.