दाऊदचे राज उघडणार साखळी बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड अबू बकर

अबू बकरला ठोकल्या बेड्या

123

मुंबईत झालेल्या १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटातील मास्टरमाइंड पैकी एक असलेला अबू बकरला अटक करण्यात भारतीय तपास यंत्रणेला यश आले आहे. अबू बकर याला युएई मधून पकडण्यात आले असून त्याला भारतात घेऊन येण्याची प्रक्रिया सुरू आहे. अबू बकर हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी असून त्याच्या अटकेमुळे दाऊद इब्राहिमचे अनेक राज उघडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अबू बकरला तब्बल २९ वर्षांनी अटक

१९९३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटात २५७ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते तर ७१३ जण जखमी झाले होते. या साखळी बॉम्ब स्फोटानंतर अबू बकर हा दुबई येथे पळून गेला होता. त्याला तब्बल २९ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अबू बकर याने शस्त्रास्त्रे आणि स्फोटाकांचे प्रशिक्षण घेतले होते. मुंबईत बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्स उतरवणे, बॉम्ब तयार करून पेरणे यामध्ये अबू बकरची महत्वाची भूमिका होती. स्फोटानंतर भारत सोडून गेल्यानंतर अबू बकर हा पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहत होता.

(हेही वाचा – महापालिका अर्थसंकल्पाचे केवळ फुगेच, मग आवळली जाते हवा! )

अबू बकरचे तपास यंत्रणेच्या टॉप १० च्या यादीत नाव

अबू बकर याला २०१९ मध्ये युएईमध्ये अटक करण्यात आली होती, मात्र काही कागदपत्रांच्या आधारे त्याने यूएई पोलिसांच्या ताब्यातून सुटका करून घेतली होती. २०१९ मध्ये भारतीय तपास यंत्रणेने त्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न असफल झाला. अखेर अबू बकर याला युएई मधून काही दिवसांपूर्वी भारताच्या तपास यंत्रणेने त्याला अटक केली असून त्याला भारतात आणले जात आहे. अबू बकर अब्दुल गफूर शेख असे त्याचे पूर्ण नाव असून मुंबईत सुरू असलेल्या दाऊदच्या तस्करीत मुस्तफा डोसासह अबू हा सामील होता. १९९३ च्या साखळी बॉम्ब स्फोटानंतर दुबईत पळून गेलेल्या अबू बकर याचे तपास यंत्रणेच्या टॉप १० च्या यादीत नाव होते. १९९७ मध्ये त्याच्या विरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती, तेव्हापासून अबू बकरला अटक करण्याचे भारतीय तपास यंत्रणेचे प्रयत्न सुरू होते.अखेर २९ वर्षांनी अबू हा भारतीय तपास यंत्रणेच्या हाती लागला. अबूच्या अटकेमुळे दाऊदच्या ठावठिकाणा कळू शकेल तसेच दाऊदच्या अनेक काळ्या धंद्याचे राज उकळण्याची शक्यता आहे. अबू बकरच्या अटकमुळे दाऊदला मोठा हादरा बसला असून दाऊदच्या भारतातील संपत्तीची माहिती समोर येऊ शकते, असे केंद्रीय तपास यंत्रणेच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.