अर्थसंकल्पातून गारगाई पाणी प्रकल्प गायब

148

मुंबईकरांना पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेने गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा-पिंजाळ आदी पाणी प्रकल्पांपैंकी गारगाई पाणी प्रकल्पालाच महापालिकेने तिलांजली दिली आहे. चालू अर्थसंकल्पात गारगाई पाणी प्रकल्पासाठी असलेली तरतूद यंदा महापालिकेने वगळून टाकली आहे. त्यामुळे आता केवळ पिंजाळ प्रकल्पासाठी निधीची तरतूद केलेली असून गारगाई पाणी प्रकल्पाला कायमचेच महापालिकेने बुडवून टाकले आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

( हेही वाचा : महापालिका अर्थसंकल्पाचे केवळ फुगेच, मग आवळली जाते हवा! )

मुंबईतील भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी दुरगामी धोरण ठरवण्यासाठी डॉ.मा.अ.चितळे यांच्या अध्यक्षतेखालील समिती गठीत करण्यात आली होती. या चितळे समितीच्या अहवालानुसार २०४१ पर्यंत मुंबईची अंदाजित लोकसंख्या मोठ्यासंख्येने वाढून पाण्याची मागणी प्रतिदिन ५९४० दशलक्ष लिटर्स अर्थात ५९४ कोटी लिटर एवढा पाणी पुरवठा अपेक्षित आहे. परंतु सध्या मुंबईकरांना ३७० कोटी लिटर एवढा पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजिक गारगाई नदीवर ६९ मीटर उंचीचे व ९७२ मीटर लांबीचे धरण बांधून तसेच गारगाई ते मोडकसागर दरम्यान बोगद्याचे काम हाती घेवून गारगाई पाणी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यानुसार कामालाही सुरुवात केली होती. या धरणासाठी जमीन ताब्यात घेण्यापासून ते बाधित लोकांचे पुनर्वसन आणि धरणांची सर्वंकष बांधणी यासाठी सुमारे ३ हजार १०५ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता.

( हेही वाचा : पवई तलाव संवर्धनासाठी महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय! )

गारगाई प्रकल्पाचे बाधितक्षेत्र हे ८४० हेक्टर असून त्यापैकी खासगी क्षेत्र हे १७० हेक्टर तसेच वनक्षेत्र हे सुमारे ६७० हेक्टर एवढे आहे. या प्रकल्पामुळे वन विभागाच्या जागेतील झाडे कापण्यास परवानगी द्यावी लागणार ही बाब लक्षात घेता राज्य सरकारने हा प्रकल्पच रद्द करण्याचे निर्देश दिले होते.

त्यातच आता महापालिकेच्या आगामी प्रकल्पांच्या यादीत गारगाई प्रकल्पालाच वगळले गेले आहे. सन २०२१-२२मध्ये गारगाई आणि पिंजाळ प्रकल्पासाठी १६२१० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित मानला गेला होता, तर सन २०२२-२३च्या अर्थसंकल्पात प्रतिष्ठीत प्रकल्पांच्या यादीत केवळ पिंजाळ प्रकल्पाची नोंद घेतली आहे. या प्रकल्पासाठी १४३९० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित मानला आहे. त्यामुळे गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेने गुंडाळून ठेवल्याची खात्री पटत आहे.

( हेही वाचा : शिवसेनेसोबत जायचं की सरकारमधून बाहेर पडायचं? ‘हा’ पक्ष द्विधा मनस्थितीत! )

प्रकल्पबाधित गावे आणि कुटुंबांची संख्या

गावांची नावे : ओगदे, खोदडे, तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले
एकूण कुटुंब : ६१९
बाधित कुटुंबे : १८५

गारगाई प्रकल्पासाठी वन व वनेत्तर क्षेत्र : ६७० हेक्टर
एकूण बाधित क्षेत्र : ८४० हेक्टर
खासगी क्षेत्र : १७० हेक्टर
वन क्षेत्र : ५९७ हेक्टर
नदी प्रवाहातील क्षेत्र : ६३.७६ हेक्टर
राज्यमहामार्ग खालील क्षेत्र : ९.१४ हेक्टर

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.