स्वर्गीय सूर हरपला…गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्राणज्योत मालवली

159

आपल्या आवाजाने ज्यांनी आपली ओळख जगभरात निर्माण केली, ज्यांच्या स्वर्गीय सुरांनी अनेक दशकं, अनेक पिढ्यांच्या मनावर राज्य केलं, त्या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांची प्राणज्योत अखेर मालवली. ५ फेब्रुवारी रोजी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर रविवारी सकाळी ८.१५च्या सुमारास मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लता दीदींच्या जाण्याने संपूर्ण भारतवर्षावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जगभरातून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात येत असून, स्वर्गीय सूर अखेर शांत झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयात केले होते दाखल

शनिवारी सकाळी लता दीदींची प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले होते. लता मंगेशकर यांचे वय ९२ वर्षे असल्याने त्यांना सुरुवातीपासूनच आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती शनिवारी पुन्हा खालावली होती. त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे त्यांच्यावर औषधाचा प्रभाव फारच कमी होत असल्याची माहिती ब्रीच कँडीचे प्रमुख डॉ. प्रतीत समदानी यांनी दिली होती. अखेर शनिवारी रात्री त्यांची मृत्युशी सुरू असलेली झुंज संपली.

कोरोनावर केली होती मात

लता मंगेशकर यांना 8 जानेवारीला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच लता दीदींना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. 22 जानेवारीला लता मंगेशकर कोरोना आणि न्यूमोनियामुक्त झाल्या. त्यांची प्रकृतीही बरीच सुधारली होती, त्यामुळे व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले होते, पण त्यांचे वय पाहता त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.