शनिवारी विकेंडला मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या परिसरातील हजारो रिलायन्स जियोच्या ग्राहकांना नेटवर्क बंद राहिल्याने एकाकी राहावे लागले, तब्बल आठ तास नेटवर्क बंद होते. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. अखेर रिलायन्सने ग्राहकांच्या संतापावर हळुवार फुंकर मारत भरपाईची घोषणा केली आहे.
आणि शनिवारची सुरुवात मोबाईलशिवाय
शनिवारी सकाळपासूनच मोबाईलवर रिलायन्स जियोचे नेटवर्क नसल्याचे दिसल्यावर अनेकांनी त्यांच्याकडे रेंज गेली असावी असा समज केला. परंतु तब्बल १-२ तास रेंज येत नाही म्हटल्यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. शेजारी, आजूबाजूचे हेच सांगू लागल्यावर जियो युजर्सना हे व्यापक संकट असल्याची जाणीव झाली. कॉलिंग आणि इंटरनेट सेवा बंद असल्याने ऐन विकेंडला रिकामेपणाची भावना अनेकांना आली. अनेकांनी नाईलाजाने अडगळीत पडलेल्या इतर नेटवर्कचे रिचार्ज मारून काम सुरू केले.
रिलायन्सने दिले गिफ्ट
परंतु रिलायन्स जियोने ग्राहकांच्या भावना ओळखून मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील दोन दिवसांसाठी अनलिमिटेड मोफत डाटा देण्याची घोषणा रिलायन्स जियो केली आहे. जियो युजर्सच्या मोबाईलवर कंपनीतर्फे तसा मेसेज पाठवण्यात आला आहे.
काय आहे मेसेज?
प्रिय जियो ग्राहक, तुमच्या सेवेची गुणवत्ता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आज (शनिवारी) सकाळी, दुर्दैवाने, तुम्हाला आणि मुंबईतील इतर काही ग्राहकांना सेवेत व्यत्यय आल्याचा सामना करावा लागला. आमच्या टीमने या नेटवर्क समस्येचे काही तासांत निराकरण केले, परंतु हा तुमच्यासाठी आनंददायी अनुभव नसावा, अशी आमचा धारणा आहे. आम्ही त्याबद्दल दिलगीर आहोत. आम्ही तुमच्या नंबरवर दोन दिवसांचा अमर्यादित डेटा प्लॅन विनामूल्य जारी करत आहोत, जो आज (शनिवारी) रात्रीपासून लागू होईल. तुमच्या वर्तमान योजनेची वैधता संपल्यावर ही विनामूल्य योजना आपोआप सक्रिय होईल. तुमच्या सेवेच्या अनुभवाला सर्वोच्च महत्त्व देण्यास आमचे प्राधान्य आहे. – जियोकडून प्रेम
Join Our WhatsApp Community