गेल्या चार वर्षांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. त्यावेळी वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात तब्बल महिनाभर अधिक काळ लता मंगेशकर यांच्यावर उपचार सुरु होते. त्यावेळीही लता मंगेशकर यांना न्यूमोनियाचे निदान झाले होते. वयाच्या कारणामुळेच उपचारास विलंब होत असल्याची पूर्वकल्पना डॉक्टरांनी दिली होती. त्यावेळी भारतासह जगभरातून लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून प्रार्थना केली गेली. देवाने लता दीदींसाठी तिच्या चाहत्यांची प्रार्थना ऐकली आणि त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या.
(हेही वाचा स्वर कोकिळाचे निधन : दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर)
दोन वर्षांपूर्वीही न्यूमोनियाने प्रकृती चिंताजनक बनलेली
वयोमानामुळे त्यांच्या तब्येतीच्या तक्रारी गेल्या चार वर्षांत खूप वाढल्या. सतत श्वासोच्छवासाच्या कारणामुळे त्या रुग्णालयात दाखल व्हायच्या. त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासाची गरज लागायची. परंतु लता दीदी सुखरुप परत यायच्या. दोन वर्षांपूर्वीही त्यांना ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही लता मंगेशकर यांना न्यूमोनियाचे निदान झाले होते. पुन्हा व्हेंटिलेटवर त्या गेल्या. २८ दिवसांच्या उपचारानंतर आपण बरे होऊन घरी परतल्याचे लता दीदींनीच ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना कळवले होते. मात्र यंदा ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील वारी लता दीदींना सर्वांपासून कायमची हिरावून गेली. महिनाभर कोरोना व न्यूमोनियावरील उपचारांवर यशस्वीरित्या मात करत त्यांच्यात गेल्या आठवड्यापासून सुधारणा दिसून आल्या. त्यांचा कृत्रिम श्वासोच्छवासाचा आधारही काढला. ऑक्सिजन देत त्यांच्यावर अतिदक्षता विभागातच उपचार सूर होते. शनिवारपासून लता दीदींची तब्येत पुन्हा खालावली. रविवारी सकाळी लता दीदींनी जगाचा निरोप घेतला…
Join Our WhatsApp Community