आपल्या सुरेल आवाजाने गेली अनेक दशकं अवघ्या विश्वाच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. आपल्या अमृताहुनी गोड अशा स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणा-या दिदींच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला आहे. आजवर दिदींनी विविध भाषांमध्ये ३५ हजारांहून अधिक गाणी गात अनेक पिढ्यांना आनंद दिला.
(हेही वाचाः लतादीदींचे निधन : दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर!)
गाण्याचे शब्द, त्या शब्दांतून मांडलेले भाव अगदी जसेच्या तसे लतादिदींनी आपल्या सुरांतून रसिकांपर्यंत पोहोचवले. आजवरच्या त्यांच्या अनेक गाण्यांनी आपल्याला भावुक केलं. पण दिदींच्या एका गाण्यामुळे रसिक तर गलबललेच, पण दिदींना स्वतःलाही हे गाणं गाताना आपले अश्रू अनावर झाले. ते गाणं होतं, कल्पवृक्ष कन्येसाठी लाउनिया बाबा गेला… या गाण्याच्या बाबतीत दिदींची एक भावनिक आठवण आहे.
(हेही वाचाः लता दीदींवर होता वीर सावरकरांचा प्रभाव! कोणत्या शब्दांत व्यक्त केलेले सावरकर प्रेम?)
केवळ ऐकू आले ते दिदींचे हुंदके…
मा. दिनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर लतादिदींच्या आई माई मंगेशकरांना त्यांच्यासाठी एक गाणं लिहून हवं होतं. त्यासाठी त्यांनी लतादिदींना जनकवी पी. सावळाराम यांचं नाव सुचवलं. तेव्हा लतादिदींच्या विनंतीवरुन पी.सावराळाम यांनी कल्पवृक्ष कन्येसाठी हे गाणं लिहिलं. पी. सावळाराम यांनी या गाण्याच्या दोन ओळी दिदींना फोनवरुन ऐकवल्या. तेव्हा दिदी सुरुवातीला काहीच बोलल्या नाहीत, अगदी निःशब्द शांतता. त्यामुळे आपलं गाणं दिदींना आवडलं नाही की काय, असा प्रश्न पी. सावळाराम यांना पडला. पण अगदी काही क्षणांतच त्यांना ऐकू आले ते दिदींचे हुंदके.
(हेही वाचाः शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो…संगीत विश्वातून श्रद्धांजली)
गाणं संपलं आणि…
या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुद्धा असाच प्रकार घडला. लतादिदी अगदी समरस होऊन आपल्या वडिलांसाठी हे गाणं गायल्या. गाणं संपलं आणि त्यांना आपले अश्रू अनावर झाले. त्या माईकसमोरच ढसाढसा रडत खाली कोसळल्या. आपल्या वडिलांच्या आठवणींनी त्यांना कशाचेच भान राहिले नाही.
हेच ते गाणं जे ऐकताना आजही आपले डोळे नकळत पाणावतात. दिदींनी सुरांतून मांडलेल्या भावना या आपल्याच भावना आहेत की काय, असं आपल्याला वाटतं. आज या स्वरलतेने भैरवी गात जगाचा निरोप घेतला. दिदी जरी अनंतात विलीन झाल्या असल्या, तरी त्यांचे स्वर अनंत काळापर्यंत आपल्या मनावर कोरले गेले आहेत. ते पुसणं नियतीलाही शक्य नाही…
(हेही वाचाः अखेरचा हा तुला दंडवत…! लता दीदी अनंतात विलीन)
Join Our WhatsApp Community