डोंबिवलीतील पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आणि एका दैनिक वृत्तमानस या वृत्तपत्राचे वरिष्ट पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेणा हल्ल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एका तरुणीसह चौघांना अटक केली आहे. हा हल्ला नेमका कुठल्या कारणातून झाला याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नसले तरी या हल्ल्यामागे एका बड्या गुंडांचा हात असल्याचे बोलले जात आहे. हा हल्ला पत्रकारितेवर झाला असून या हल्ल्यामागे जो कोणी असेल त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया कल्याण-डोंबिवलीतील पत्रकारांनी दिली आहे, या हल्ल्याचे तीव्र पडसाद कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांमध्ये उमटले आहे.
दुकानातील सामानाचे नुकसान करून श्रीराम यांच्यावर जीवघेणा हल्ला
विशाल उर्फ बबन खांडेकर, अमोल सावंत, अनच उर्फ नानु आंग्रे, श्याम उर्फ हिरू रेवनकर आणि कीर्ती अमोलकर (२३) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे असून या मागचा सूत्रधार गौरव शर्मा हा फरार असून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. गौरव शर्माच्या सांगण्यावरून हा हल्ला केल्याची कबुली अटक हल्लेखोरांनी दिली आहे. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे पत्रकार श्रीराम कांदू हे आपल्या मिठाईच्या दुकानात बसून बातम्यांचे काम करीत असताना एक तरुणी त्यांच्या दुकानात आली, तिने काही सामान खरेदी केल्यानंतर दुकानातील रेकी करून बाहेर उभ्या असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना इशारा केला. प्रथम या तरुणीने आरडाओरड केला आणि काही क्षणात तिचे साथीदार दुकानात घुसले आणि काही कळण्याच्या आतच त्यांनी श्रीराम कांदू यांच्या दुकानात शिरले व दुकानातील सामानाचे नुकसान करून श्रीराम यांच्यावर जीवघेणा हल्ला करून रिक्षातून पसार झाले.
(हेही वाचा दाऊदचे राज उघडणार साखळी बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड अबू बकर)
हल्ल्याचा तीव्र निषेध केला
या हल्ल्यात श्रीराम कांदू हे जखमी झाले, त्यांना शेजारच्या दुकानदारांनी तात्काळ डोंबिवलीच्या शास्त्री नगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या हल्ल्याची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी श्रीराम कांदू यांचा जबाब नोंदवून ५ ते ६ अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच, डोंबिवलीतील पत्रकारांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. कांदू यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे डोंबिवलीतील राजकीय पक्षाच्या नेत्यांनी श्रीराम कांदू यांची भेट घेऊन या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा हल्ला पत्रकारितेवरिल हल्ला असल्याचे मत भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.
आरोपीचा ताबा टिळक नगर पोलिसाकडे सोपवण्यात आला
याप्रकरणी गुन्हे शाखा घटक ३ च्या पथकाने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध घेऊन पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असून दिवा, कळवा आणि ठाणे परिसरात राहणारे असून त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, मारहाण करणे यासारखे अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. या हल्लेखोरांना डोंबिवली परिसरात राहणाऱ्या गौरव शर्मा या गुंडाने श्रीराम कांदू यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुपारी दिली होती, अशी धक्कादायक माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या चौकशीत समोर आली आहे. पोलीस गौरव शर्मा याचा कसून शोध घेत असून या हल्ल्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नसून शर्मा याला अटक करण्यात आल्यानंतर हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा ताबा टिळक नगर पोलिसाकडे सोपवण्यात आला असून पुढील तपास टिळक नगर पोलीस ठाणे करीत आहे.
Join Our WhatsApp Community