भारतात एकही व्यक्ती अशी नाही, जिने लता दिदींचं गाणं ऐकलं नाही. पण त्याचबरोबर भारतातील अशी एकही भाषा नाही ज्यात दिदींनी गाणं गायलं नाही. 22 पेक्षा जास्त भाषांमध्ये दिदींनी आजवर गाणी गायली आहेत आणि ती लोकप्रिय सुद्धा झाली आहेत.
पण इतक्या भाषांमधून गाणं गाणा-या लता दिदींना एकदा अभिनेते दिलीप कुमार यांनी भाषेवरुन हिणवलं होतं. त्यानंतर दिदींनी भाषा शिकण्याचा ध्यास घेतला. एका मुलाखतीत दिदींनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे.
(हेही वाचाः ‘हे’ गाणं गाताना दिदी माईकसमोर ढसाढसा रडल्या होत्या…)
दिलीप कुमार यांचे ‘ते’ शब्द दिदींच्या मनाला फार लागले
एकदा लता दिदी संगीतकार अनिल विश्वास यांच्यासोबत ट्रेनने मालाडला स्टुडिओमध्ये जात होत्या. त्यावेळी त्यांना दिलीप कुमार भेटले. अनिल विश्वास यांनी दिलीप कुमार यांच्याशी लता दिदींची ओळख करुन दिली. त्यावेळी दिलीप कुमार यांनी दिदींच्या आडनावावरुन तुम्ही मराठी आहात का, असं विचारलं. त्यावेळी दिदी म्हणाल्या, हो मी मराठी आहे. तेव्हा दिलीप कुमार त्यांना म्हणाले,
मराठी लोगोंके ऊर्दू मे दाल चावल की बू होती हैं…
ती गोष्ट दिदींच्या मनाला फार लागली. त्यावेळी दिदींनी ऊर्दू शिकण्याचा ध्यास घेतला.
(हेही वाचाः लता दीदींचा सन्मान करण्यात महाराष्ट्राच्या आधी ‘या’ राज्याने मारली बाजी!)
दिदींची सगळ्या भाषांतील गाणी लोकप्रिय
मग दिदींनी ऊर्दू भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली, ऊर्दू भाषेतील साहित्य त्यांनी वाचून काढलं. त्यासोबतच त्यांनी हिंदी, तामिळ, बंगाली, पंजाबी अशा सर्व भाषांचा अभ्यास केला. या सर्व भाषांमध्ये दिदींनी गायलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांना इतर भाषांतील गाण्यांसाठीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कुठलंही गाणं गाताना दिदी गाण्यातील शब्दांचे अर्थ समजून घेतल्याशिवाय गाणं गात नसत. आपल्या गाण्यावर असलेली त्यांची श्रद्धा आणि कामातील प्रामाणिकपणा यावरुन आपल्याला दिसून येतो.
दिदींचा आदर्श अनेक पिढ्यांना मार्गदर्शक
रविवार ६ फेब्रुवारीला आपल्या सर्वांच्या लाडक्या लता दिदींनी अखेरचा श्वास घेतला. या स्वरलतेने भैरवीचे स्वर आळवत जगाच्या मैफिलीतून आपला निरोप घेतला आणि दिदींच्या गाण्याने मंत्रमुग्ध होणारे त्यांचे चाहते पहिल्यांदाच सुन्न झाले. पण दिदींनी आपल्या कामातून घालून दिलेला आदर्श पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करणारा आहे.
(हेही वाचाः स्मारकाचा वाद तापणार? राऊत म्हणताय लता दीदींचं स्मारक होईल पण…)
Join Our WhatsApp Community