“पत्नी और बेटी की बिमारी से मै परेशान था, उनका दु:ख देखा नहीं जा रहा था, इसलिए उनको मुक्ती दे दि मैंने” अशी धक्कादायक कबुली देणाऱ्या ८९ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाला मेघावाडी पोलिसांनी ८१ वर्षीय पत्नी आणि ५५ वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. या हत्याकांडाने जोगेश्वरी पूर्व परिसर हादरला असून, पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
म्हणून दोघींना संपवलं
पुरुषोत्तम सिंग गंडहोक (८९) असे अटक करण्यात आलेल्या वयोवृद्ध इसमाचे नाव आहे. जोगेश्वरी पूर्वेतील शेर- ए- पंजाब कॉलनीतील प्रेमसंदेश सोसायटीच्या क्रमांक २ प्लॅटमध्ये पत्नी जसबीर कौर (८१) आणि मानसिक विकलांग असणारी मुलगी कमलजीत कौर (५५) यांच्यासोबत राहत होते. पुरुषोत्तम यांची ५८ वर्षांची विवाहित मुलगी गुरबीदंर कौर आनंद ही जवळच असणाऱ्या मुक्तेश्वरी इमारतीत आपल्या कुटूंबासह राहते. जसबीर कौर ही मागील १० वर्षांपासून आजारी होती, तिला गुडघ्याचा त्रास असल्यामुळे, ती सतत बेडवर पडून असायची. गुरबीदंर कौर आनंद ही नेहमी वडिलांना फोन करून किंवा भेटायला येऊन त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होती. तसेच, त्यांना काय हवं नको ते बघायची.
सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास पुरुषोत्तम यांनी मोठी मुलगी गुरबीदंर कौर हिला फोन करून कळवले की,”मैंने तुमारी माँ, जसबीर कौर और बहन कमलजित को खत्म कर दिया है। क्योंकि मुझे उनका दुःख सहन नही हो रहा था और उनकी देखभाल करना भी मुझसे नहीं हो रहा था।” असे बोलून त्यांनी फोन कट केला. हे ऐकताच गुरबिंदर कौर ही आपल्या मुलासह वडीलांच्या घरी आली असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. तिने वडीलांना जोर-जोरात आवाज दिला, त्यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला व “आप पुलिस को बुलाओ, पुलिस आने पर ही मैं दरवाजा खोलुंगा” असे सांगितले.
धक्कादायक कबुली
काही वेळाने मेघवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पुरुषोत्तम यांनी दार उघडले. पोलिसांनी आत जाऊन बघितले, तर बेडरूममध्ये जसबीर कौर आणि कमलजीत कौर यांचे मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. तसेच, पुरुषोत्तम याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी त्याच्याकडे चौकशी केली असता, “पत्नी और बेटी की बिमारी से मैं परेशान था, उनका दु:ख देखा नहीं जा रहा था, इस लिए उनको मुक्ती दे दी मैंने” अशी धक्कादायक कबुली त्याने पोलिसांकडे दिली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून, पुरुषोत्तम याला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास मेघावाडी पोलीस करीत आहे.