मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये २२७ प्रभागांवरूनही ही संख्या २३६ एवढी वाढण्यात आल्यानंतर शहरातील भायखळा ई विभागांमध्ये एक प्रभाग वाढवण्यात आला आहे. मात्र, हे प्रभाग वाढवताना काँग्रेसचे तीन नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचा एक अशाप्रकारे चार प्रभागांचा भाग कापून प्रभाग क्रमांक २२१ या नवीन प्रभागाची निर्मिती केली आहे. मात्र, यामध्ये उमरखाडी, डोंगरीचा ३५ ते ४० टक्के भाग असून नेमक्या याच भागांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्देशानुसार आधी पदपथाचे आणि आता दोन खेळाच्या मैदानांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसचे बालेकिल्ले असलेले हे प्रभाग जाणीवपूर्वक कापले का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मुंबई महापालिकेच्या ई विभागामध्ये प्रभाग क्रमांक २१० मध्ये काँग्रेस नगरसेविका सोनम जामसूतकर आहेत. त्यांचे पती मनोज जामसूतकर हे शिवसेनेत असले तरी जामसूतकर या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणूनच नोंद आहे. तर प्रभाग क्रमांक २११ मध्ये समाजवादी पक्षाचे महापालिका गटनेते रईस शेख, प्रभाग क्रमांक २१३ मध्ये काँग्रेसचे जावेद जुनेजा अणि बी विभागामधील प्रभाग क्रमांक २२३ मधील काँग्रेस नगरसेविका निकीता निकम या चार प्रभागांचे तुकडे करत नवीन प्रभाग रचनेमध्ये २२१ या नवीन प्रभागाची रचना करण्यात आली आहे.
भायखळ्यामध्ये नव्याने बनवण्यात आलेल्या प्रभागाची हद्द ही खडा पारशी, भायखळा जिल्हा कारागृह, नागपाडा पोलीस हॉस्पिटल, जे जे हॉस्पिटल, वाडीबंदर, सॅण्डहस्टर्ड रेल्वे स्टेशन, ग्राँट मेडिकल कॉलेज अशाप्रकारे आहे. परंतु यामध्ये काँग्रेसच्या निकिती ज्ञानराज निकम यांच्या प्रभागातील ३५ ते ४० टक्के भाग कमी करण्यात आला आहे, तर काँग्रेसचे सोनम जामसूतकर यांच्या प्रभागातील २० ते २२ टक्के समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांच्या प्रभागातील २५ टक्के आणि काँग्रेसचे जावेद जुनेजा यांच्या प्रभागातील १० टक्के भाग कापून नवीन प्रभागाची रचना करण्यात आली आहे.
त्यामुळेच या प्रभागाच्या हद्दी कमी झाल्या…
त्यामुळे या नवीन प्रभागांमध्ये ६० ते ७० टक्के हिंदु मतदार आणि मुस्लिम समाज हा ३० टक्के अशाप्रकारे असून मराठी मतदारांचा टक्का हा ४० ते ५५ टक्के एवढा आहे. त्यामुळे भायखळ्यामध्ये एक प्रभाग वाढवताना त्याचा लाभ काँग्रेस किंवा समाजवादी पक्षाला न होता शिवसेनेला कशाप्रकारे होता येईल याचा विचार करत काँग्रेस व समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांचे प्रभागांचे तुकडे करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक जास्त फटका काँग्रेसचे ज्ञानराज निकम यांच्या प्रभागाला बसणार असून त्यांचा विजयाचा पट्टा असलेला भागच कमी करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या जागेवर शिवसेनेचा डोळा होता आणि त्यामुळेच या प्रभागाच्या हद्दी कमी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भाग कापून दुसऱ्या प्रभागाला जोडायचे या मागील राजकारण काय
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रभाग क्रमांक २२३ मधील विविध पदपथ, वाहतूक बेट, उड्डाणपूलाखालील मोकळ्या जागेचे सुशोभिकरण इत्यादी सुधारणा व सौंदर्यीकरणाचे काम सुचवले होते. त्यानुसार बी विभागातील सामंतभाई नानजी मार्गावरील पदपथाचे सौंदर्यीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. याला स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर आता चिंचबंदर येथील खेळाच्या मैदानाची सुधारणा व सौंदर्यीकरण करणे तसेच येथील वीर संभाजी खेळाच्या मैदानाची सुधारणा व सौंदर्यीकरण करण्याचेही प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आधी जो भाग कमी करण्यात येणार होता, तेथील विकासकामांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सुचनांनुसार विकासाची कामे करायची आणि दुसरीकडे तोच भाग कापून दुसऱ्या प्रभागाला जोडायचे या मागील राजकारण काय असा प्रश्न खुद्द काँग्रेसच्याही कार्यकर्त्यांना पडलेला आहे.
Join Our WhatsApp Community