मुंबई पोलिस भरतीच्या वैद्यकीय चाचणीदरम्यान एकाचवेळी ४ मुन्नाभाई पोलिसांना आढळून आले आहेत. हे चौघे डमी उमेदवार म्हणून वैद्यकीय चाचणीला आले होते. भोईवाडा पोलिसांनी या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या चौघांना डमी म्हणून बसवणाऱ्या खऱ्या उमेदवारांचा शोध पोलिस घेत आहेत. एका आठवड्यात पोलिस भरतीत ६ डमी उमेदवारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
(हेही वाचाः चांदिवली संघर्ष नगरमध्ये महापालिका बांधणार रुग्णालय, सल्लागार नियुक्ती शेवटच्या टप्प्यात)
उमेदवारांची होत आहे वैद्यकीय चाचणी
मुंबई पोलिस २०१९ भरती प्रक्रिया मुंबई पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. मुंबई पोलिस शिपाई या पदाच्या १ हजार ७६ जागांच्या भरती परीक्षेसाठी १ लाख ९ हजार दोनशे उमेदवार बसले होते. लेखी, शारिरीक, मैदानी चाचण्यांनंतर योग्य उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना ३ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान वैद्यकीय चाचणीसाठी बोलवण्यात येत आहे.
असा उघड झाला प्रकार
नायगाव पोलिस मुख्यालय येथे ही चाचणी ठेवण्यात आली आहे. ३ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय चाचणीसाठी आलेल्या उमेदवार भगवान टकले नावाने वैद्यकीय चाचणी देणाऱ्या इसमावर पोलिसांना संशय आल्यामुळे त्यांनी इतर भरतीच्या ठिकाणी व्हिडिओ तपासले असता, त्यात भगवान टकले हा वेगळा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव विशाल गुसिंगे असे सांगितले व तो भगवान टकले यांच्या जागेवर डमी म्हणून वैद्यकीय चाचणी देण्यासाठी आला असल्याची माहिती दिली.
(हेही वाचाः धक्कादायक! मुंबईत घातपाताचा कट उधळला)
सहा डमी उमेदवार
५ फेब्रुवारी रोजी ज्ञानेश्वर तुकाराम घोडके यांच्या जागेवर डमी उमेदवार म्हणून विकास शेळके, तसेच कली नावाच्या उमेदवाराच्या जागेवर प्रविण शिवाजी शिदे हा डमी उमेदवार म्हणून चाचणी देण्यासाठी आला होता. कुंडलीक पांडुरंग शिदे याच्या जागेवर गणेश पवार हा डमी उमेदवार चाचणीसाठी आला होता, तर कोल्हापूर येथून आलेला गोट्या पाटील हा डमी उमेदवार विकास मारूती साळुंखे याच्या जागेवर वैद्यकीय चाचणी देण्यासाठी आला होता. यातील पाच उमेदवार हे बीड, जालना येथून आलेले असून, एक जण कोल्हापूर येथून आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
या सहा जणांविरुद्ध भोईवाडा पोलिस ठाण्यात फसवणूक, खोटे दस्तावेज तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस भरतीसाठी डमी उमेदवारांना पैसे देऊन त्यांना शारिरीक चाचणी, वैद्यकीय चाचणीसाठी एक रॅकेट काम करत असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
(हेही वाचाः लवकरच मुंबईत संपूर्ण ‘अनलॉक’? महापौरांचे संकेत)
Join Our WhatsApp Community