शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईचा दादा शिवसेनाच असल्याचे विधान केले असून आम्ही जर घुसलो तर नागपूरला जाणंही त्यांना मुश्किल होईल, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. सिंह कधी गिधाडांच्या धमक्यांना घाबरत नाही, असे विधान करून फडणवीस यांनी राऊतांवर पलटवार केला आहे. त्यांनी गोव्यातील पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देत फडणवीस यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. राऊत व्हिक्टि्म कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘शेर कभी गीदडों की धमकीयों से डरते नहीं!’, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
काय म्हणाले फडणवीस…
यावेळी फडणवीस म्हणाले की, ईडी काय करते ते ईडी सांगेल, मला असं वाटतं की, संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सगळे वक्तव्य त्याचाच भाग आहे. राऊतांनी त्यांचे मत न्यायालयात मांडावं, रोज सकाळी ९ वाजता येऊन संजय राऊत मनोरंजन करण्याचे काम करत असतात. त्याच्यापेक्षा त्यांच्या वक्व्याला महत्त्व देऊ शकत नाही. त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, सिंह कधी गिधडांच्या धमक्यांना घाबरत नाही. त्यांनी न्यायालयात जावं.
(हेही वाचा – किरीट सोमय्यांना आहे कसली ‘नशा’? वाचा…)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये त्रास देण्याचे काम करत नाही. यामुळे त्यांनी व्हिक्टिम कार्ड खेळण सोडावे, असा पलटवार फडणवीसांनी राऊतांवर केला आहे. संजय राऊत संपादक आहेत. त्यामुळे त्यांना माहिती आहे की, हेडलाईन कशी करता येईल. म्हणून तशा प्रकारचे वक्तव्य करुन दिवसभर चर्चेत राहण्याचे काम संजय राऊत करतात असे फडणवीस म्हणाले.