स्वातंत्र्यानंतरही शिक्षण पद्धतीवर वसाहतवादी छटा कायम! उपराष्ट्रपतींची खंत

98

शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी दुर्लक्षित राष्ट्रीय नायकांचा सन्मान करण्याचे आणि त्यांच्या जीवन प्रवासातील किस्से सांगण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडूंनी केले. भारताची सभ्यता मूल्ये प्रतिबिंबित करणाऱ्या स्वातंत्र्यलढ्यातील सामाजिक एकोप्याच्या कथा पुन्हा सांगण्याची सूचना त्यांनी केली. उपराष्ट्रपती महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (एमईएस) 160 वर्षांच्या वारशाची ऐतिहासिक माहिती असलेल्या ‘ध्यास पंथे चालता’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना बोलत होते.

भारतभूमीवरील शूर वीरांच्या कथा शिकवा

इतिहास शिकवण्याच्या महत्त्वावर बोलताना नायडू म्हणाले, ‘या भूमीने पाहिलेल्या अशा शूर वीरांच्या कथा आपण आपल्या मुलांना शिकवल्या पाहिजेत. आपल्या गौरवशाली इतिहासाने आपल्या मनातील कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड दूर केला पाहिजे. इतिहास खरोखरच आपल्याला शिक्षित, ज्ञानी आणि बंधमुक्त करू शकतो.’’नायडू यांनी चिंता व्यक्त केली की, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्या शिक्षण पद्धतीत वसाहतवादी छटा कायम आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीने हे दूर केले पाहिजे. उपराष्ट्रपती नायडू यांनी नमूद केले की 1860 मध्ये पुण्यात स्थापन झालेली ही सोसायटी देशातील पहिली खासगी शैक्षणिक संस्था होती, जी तरुणांना वैज्ञानिक शिक्षण देण्याच्या आणि लोकांमध्ये राष्ट्रीय मूल्ये वाढवण्याच्या उद्देशाने महान “आद्य क्रांतिकारक” वासुदेव बळवंत फडके यांच्या सारख्या दिग्गजांच्या प्रयत्नाने स्थापन झाली होती.

(हेही वाचा स्वातंत्र्यलढ्याचा वैचारिक पाया रचण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता)

स्वातंत्र्यलढ्याचा वैचारिक पाया रचण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता

वासुदेव बळवंत फडके यांचा उल्लेख करून, नायडू यांनी त्यांची वसाहतवादी राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या सुरुवातीच्या क्रांतिकारकांपैकी एक म्हणून प्रशंसा केली. स्वराज्याच्या मंत्राचा उपदेश देऊन आणि स्थानिक समुदायांचा पाठिंबा मिळवून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध ज्या शौर्याने लढा दिला तो खरोखरच कल्पनातीत आहे असे ते म्हणाले.अशाच प्रकारे महाराष्ट्राने दिलेल्या योगदानाची महती सांगताना उपराष्ट्रपती म्हणाले की, नेते आणि संघटना निर्माण करण्यात आणि स्वातंत्र्यलढ्याचा वैचारिक पाया रचण्यात महाराष्ट्र आघाडीवर होता. दादोबा पांडुरंग, गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविंद रानडे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासारख्या दिग्गजांचे नेतृत्व असलेल्या परमहंस मंडळी, पूना सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक समाज यांसारख्या संघटनांनी “भारतात अर्थपूर्ण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी” केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख त्यांनी केला.महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि इतर संस्थांनी ‘शिक्षण हे अभियान ’ म्हणून स्वीकारले आहे, असे निरीक्षण करून नायडू यांनी शिक्षणाचा वसा पुढे नेण्यासाठी आता अशीच भावना ठेवण्याचे आवाहन केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.