ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे?

129

शहरातील धोकादायक, अति धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देण्याचं माझं स्वप्न असून अत्यंत जिव्हाळ्याच्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या माध्यमातून ते पूर्ण होताना समाधान वाटत असल्याची भावना राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने लोकमान्य नगर, कोरस रोडवरील सुविधा भूखंडावर शहरातील समूह विकास योजनेंतर्गत संक्रमण शिबीर इमारत बांधकामाच्या भूमीपुजन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात

यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शहरातील बेकायदा धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लाखो ठाणेकरांना हक्काचे आणि सुरक्षित घरकुल देणाऱ्या महत्त्वाकांक्षी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेने महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. वागळे इस्टेट येथील क्लस्टर योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणा असलेली सिडको आणि ठाणे महानगरपालिका यांच्यात यापूर्वीच सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. लवकर या प्रकल्पाला गती मिळणार असून ही ठाण्यासाठी एक अभिमानाची बाब आहे. ठाण्यातील धोकादायक इमारतींत राहणाऱ्या लक्षावधी नागरिकांना त्यांच्या हक्काचे व सुरक्षित घर मिळावे यासाठी ठाण्यातील लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून लढा सुरु होता. या लढ्यातूनच हा भव्य प्रकल्प साकारत आहे. नगरविकास विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर लगेचच या महत्त्वपूर्ण योजनेतील त्रुटी दूर करून योजनेला गती देण्यात आली आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात किसननगर येथील क्लस्टर योजनेला सुरुवात होणार असल्याचेही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले.

(हेही वाचा मोदींनी केलं शरद पवारांचं कौतुक, म्हणाले…)

१५०० हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना

ठाणे शहरात एकूण १५०० हेक्टरहून अधिक जमिनीवर क्लस्टर योजना साकारत असून यात नागरिकांना स्वमालकीची, सुरक्षित घरे मिळण्याबरोबरच रुंद रस्ते, उद्याने, मैदाने, मूलभूत सोयीसुविधा, रोजगार केंद्रे,अर्बन फॉरेस्ट आदी वैशिष्ट्ये असणार आहेत. शहरातील धोकादायक अति धोकादायक इमारतीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकास न्याय देण्याचे काम करण्यात येणार असून अनेक वर्षांच स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची भावना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के म्हणाले की, या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन कसे होणार हा मोठा प्रश्न होता पण एकनाथ शिंदे यांनी मोठा लढा उभा केला आणि या लढ्याला यश आले असून आजच हा सुवर्ण दिवस उजाडला आहे. ठाणेकरांच्या हक्काच्या घरासाठी जो शब्द दिला तो पूर्ण केला असून यापुढे नागरिकांचा सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.