१४ फेब्रुवारीला अण्णांचं ठाकरे सरकारला व्हॅलेंटाईन गिफ्ट!

124

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा अण्णा हजारे यांनी केली आहे. महाराष्ट्र सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये दारूविक्रीला परवानगी दिल्यानंतर अण्णा हजारे संतप्त झाले आहेत, त्यानंतर त्यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. यासंदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. यामध्ये त्यांनी येत्या 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला अण्णा हजारे जणू ठाकरे सरकारला अशा प्रकारचे व्हॅलेंटाईन डे गिफ्ट देणार असल्याची चर्चा होत आहे.

नुकतीच ठाकरे सरकारने सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअरमध्ये दारू विक्रीला परवानगी दिली आहे, त्याबाबत सरकारचे मंत्री वेगवेगळे तर्कवितर्क लावत आहेत, त्या विरोधात अण्णा हजारेंनी मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ अण्णा हजारे यांनी नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते, मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

काय म्हटले आहे पत्रात…

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो. महिलांना त्रास होऊ शकतो याचा विचार सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत आहे, युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही, असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्चर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

(हेही वाचा – किरीट सोमय्यांना आहे कसली ‘नशा’? वाचा…)

अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला बसणार असून उपोषणाच्या माध्यमातून सरकारच्या या निर्णयाला विरोध करणार आहेत. खरे तर अशाप्रकारे मद्यविक्रीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केला तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधी पक्ष भाजपवर जोरदार टीका करत असतानाच आता अण्णा हजारेही निषेधार्थ उतरले आहेत. यापूर्वी अण्णा हजारे यांनी सरकारचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले होते. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये नशा रुजवण्याचे वाईट काम होईल, असे ते म्हणाले होते. यासोबत ते म्हणाले की, व्यसनमुक्तीसाठी काम केले पाहिजे, परंतु सरकारने आर्थिक फायद्यासाठी दारू विक्रीला परवानगी दिल्याचे पाहून मला खूप वाईट वाटते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.