पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर केवळ १० महिन्यांचा कालावधीत उभारण्यात आलेल्या या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय भव्य ‘व्ह्युइंग डेक’मुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीजवळ असणाऱ्या या पर्यटन स्थळाचे नामकरण ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’ असे करण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर या स्थळाच्या धर्तीवर मुंबईतील इतर पातमुखांवर देखील ‘व्ह्युइंग डेक’ उभारावेत’ असेही निर्देश त्यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
बृहन्मुुंबई महानगरपालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाच्या वतीने दादर चौपाटी लगत अभिनव व आकर्षक ‘व्ह्युवींग डेक’ चे लोकार्पण राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी झाले. त्याप्रसंगी प्रसार माध्यमांशी व उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.
(हेही वाचा – १४ फेब्रुवारीला अण्णांचं ठाकरे सरकारला व्हॅलेंटाईन गिफ्ट!)
दादर चौपाटी लगत असलेल्या ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्युवींग डेक’ची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे:-
१. डेकची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट आहे
२. डेक चे क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट इतके आहे
३. डेकचे बांधकाम मार्च २०२१ मध्ये सुरू झाले होते व केवळ दहा महिन्यांच्या विक्रमी कालावधीत या भव्य व देखण्या डेकचे बांधकाम पूर्ण करण्यात आले.
४. डेकचे बांधकाम २६ पिलर्सवर करण्यात आलेले आहे.
५. डेकवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या ‘एलईडी’ दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली.
६. डेकवर एका वेळी ३०० व्यक्ती उभ्या राहू शकतात.
७. डेकवर किमान १०० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. यासाठी सदर ठिकाणी २६ बाक ठेवण्यात आले आहेत. तसेच ८ ठिकाणी वैविध्यपूर्ण आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
८. पर्यावरण पूरकतेचा भाग म्हणून याठिकाणी विविध प्रकारची १३० झाडे लावण्यात आलेली आहेत
९. दादर व सभोवतीच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा या डेक खाली असणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखातून समुद्रात करण्यात येतो.
याप्रसंगी स्थानिक आमदार सदा सरवणकर, महानगरपालिका सभागृह नेता तथा स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत, माजी महापौर व नगरसेवक मिलिंद वैद्य, माजी महापौर व नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका प्रीती पाटणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उपआयुुक्त (परिमंडळ २) हर्षद काळे, ‘जी उत्तर’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर विशेषत्वाने उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community