चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप

122

अकोला जिल्ह्याच्या पातूर तालुक्यातील सस्ती येथील एका 60 वर्षीय वृद्धाने चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणी अकोल्याचे अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली होती.

पीडितेच्या आजीला दिली धमकी

28 नोव्हेंबर 2019 रोजी 5 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने पोलिस स्टेशन चान्नी येथे फिर्याद दिली की, तिची नात गजानन शिवाजी गवाई यांच्या किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली होती. दुकानदाराने तिला दुकानामध्ये बोलावून तिचा विनयभंग केला. याबाबत पीडितेने तिच्या आजीस सांगितले असता, पीडितेची आजी दुकानात गेली व त्याला जाब विचारला. तेव्हा उलट तिलाच धमकावून ‘तुमच्या ने जे होते ते करा” अशी धमकी त्याने दिली. तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

(हेही वाचाः आता आंघोळीसह कपडेही धुवा एकाच जागी, ‘या’ १० ठिकाणी असणार सुविधा केंद्रे)

अशा आहेत शिक्षा

न्यायालयातील युक्तीवादानंतर गजानन शिवाजी गवई यास अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्या प्रकरणी न्यायालयाने आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम ५०६ मध्ये दोन वर्ष कारावास व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास व पोक्सो कायदा कलम तीन व चारमध्ये आजीवन कारावास व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास आणि कलम सात व आठमध्ये पाच वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली.

पीडितेलाही मिळणार मदत

वरील सर्व शिक्षा सोबत भोगावयाच्या आहेत. दंडाची एकूण रक्कम १ लाख ६५ हजार रुपये आहे. सदर दंडाची रक्कम दोषीकडून वसूल झाल्यास त्यापैकी अर्धी रक्कम पीडितेस देण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. बचाव पक्षातर्फे पाच साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. पीएसआय रामराव राठोड यांनी प्रकरणात तपास केला. सरकार पक्षातर्फे सहा.सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी मोहन ढवळे यांनी सहकार्य केले.

(हेही वाचाः ठाणेकरांनो! ‘या’ भागात २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.