ताडदेव येथील वसंतराव नाईक चौकातील वाहतूक बेटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. महापालिका डी विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने करण्यात आलेल्या या सुशोभीकरणात आकर्षक विद्युत रोषणाईवर अधिक भर देण्यात आला आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित पडलेला हा चौक आता झगमगून गेला आहे.
अशी आहे सुशोभित वास्तू
वसंतराव नाईक चौक हे वाहतूक बेट असून येथील १४ हजार २०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या जागेचा काही समाजकंटकांकडून गैरवापर होत होता. त्यामुळे तारदेव आणि तारदेवी मंदिराच्या अनुषंगाने तेथील वास्तू कलेच्या थीम वर हे सुशोभीकरण करण्यात आले आहे. यामध्ये वॉकिंग ट्रॅक, छोटे कारंजे एक शिल्प आणि अॅम्फीथिएटर बनवण्यात आले आहे.
(हेही वाचाः मुंबईत लता दिदींच्या नावाने होणार आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय!)
सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध- आदित्य ठाकरे
या वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी पार पडले. स्थानिक शिवसेना नगरसेविका अरुंधती दुधवाडकर यांच्या प्रयत्नाने साकारलेल्या या सुशोभित चौकाच्या लोकार्पण प्रसंगी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्ते, पदपथ, पाणी, वाहतूक बेटं ही सर्व कामे करण्यासाठी म्हणजेच मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. जोपर्यंत चांगले रस्ते, फूटपाथ, वाहतूक बेटं आपण तयार करणार नाही तोपर्यंत चांगला व्यवसाय मुंबईत येणार नाही. मुंबईच्या शाश्वत विकासाची कामे आपण पुढे नेत आहोत. या सर्व कामांना नागरिकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्हाला शक्ती, ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईकरांपेक्षा कोणी मोठं नाही
मुंबईकरांपेक्षा कोणी मोठं नसून मुंबईकरांचा आवाज हा सर्वात मोठा आहे. विकासकामे करत असताना हा विभाग, प्रभाग तसेच कुठल्या पक्षाचा नगरसेवक आहे हा भेदभाव न करता मुंबईकरांची कामे करत आहोत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
(हेही वाचाः लोअर परळच्या पुलाचे काम कुणामुळे रखडणार?)
याप्रसंगी उप महापौर ऍड. सुहास वाडकर, आमदार मंगलप्रभात लोढा, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर, स्थानिक नगरसेविका सरिता पाटील, माजी नगरसेवक अरुण दुधवडकर, उपायुक्त (परिमंडळ -१) रणजीत ढाकणे, “डी” विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community