शिवसेनेच्या सत्तेत पहिल्यांदा बसणार प्रशासक

123

मुंबई महापालिकेची मुदत येत्या आठ मार्च रोजी संपुष्टात येत असल्याने महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. येत्या ७ मार्चनंतर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाईल, असे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. जर येत्या आठ मार्चपासून महापालिकेत प्रशासकाची नेमणूक झाली, तर शिवसेनेच्या सत्तेतील हे पहिले प्रशासक ठरणार आहेत. तब्बल ३६ वर्षांनी मुंबई महापालिकेत प्रशासकाची नेमणूक केली जाणार आहे. एप्रिल १९८४ मध्ये पहिल्या प्रशासकाची नेमणूक झाली होती. द.म. सुखटणकर हे या महापालिकेतील पहिले प्रशासक होते.

२५ वर्षे मुंबई महापालिकेवर सेनेचा झेंडा 

मुंबई महापालिकेचे १९८५ मध्ये शिवसेनेची पहिली सत्ता आली. त्यापूर्वी १९७१-७२ डॉ. हेमचंद्र गुप्ते यांच्या रूपाने शिवसेनेचे पहिले महापौर बनले असले तरी आणि त्यानंतर सुधीर जोशी, मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक हे  महापौर बनले असले तरी पहिली सत्ता आली ती १९८५-८६ मध्ये. छगन भुजबळ हे महापौर बनले आणि तिथून १९९१-९२ पर्यंत सेनेची सत्ता होती. परंतु १९९२ च्या निवडणुकीत काँग्रेसला अफाट यश मिळाले आणि केवळ काँग्रेसचे ११२ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर चंद्रकांत हंडोरे १९९२-९३ मध्ये महापौर बनल्यानंतर अवघ्या चार वर्षांतच ही सत्ता शिवसेनेने काबीज केली. १९९६-९७ मध्ये काँग्रेसची मते फोडून मिलिंद वैद्य हे महापौर बनले तेव्हापासून ते आजतागायत सेनेची सत्ता महापालिकेवर कायम आहे. तब्बल २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सेनेचा झेंडा अविरत फडकत आहे.

(हेही वाचा महापालिकेवर प्रशासक नेमण्याची घाई सरकारने का केली?)

आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रशासक म्हणून नेमले जातील

मात्र, मुंबई महापालिकेत १९८५ मध्ये शिवसेनेची सत्ता येण्यापूर्वी १ एप्रिल ते ११ नोव्हेंबर १९८४ मध्ये प्रथमच द.म. सुखटणकर यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली होती. तर पुढे १२ नोव्हेंबर १९८४ ते ०९ मे १९८५ या कालावधीत जे.जी. कांगा यांनी प्रशासक म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयानुसार आणि निवडणूक कार्यक्रम नियोजित वेळेत जाहीर न झाल्यास तब्बल ३६ वर्षांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची वेळ येणार आहे. तसे झाल्यास सेनेची असताना प्रथमच प्रशासक नेमला जाणार आहे. विशेष म्हणजे राज्यात शिवसेनेची सत्ता असताना सेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत प्रशासक नेमला जाणे हाही निव्वळ योगायोग ठरणारा आहे. जर ८ मार्च पासून प्रशासक नेमण्याची कार्यवाही झाल्यास विद्यमान आयुक्त इक्बाल सिंह चहल हे प्रशासक म्हणून नेमले जातील. तसे झाल्यास द.म. सुखटणकर आणि जे.जी. कांगा या प्रशासक बनलेल्या आयुक्तांच्या पंक्तीत जाऊन इक्बाल सिंह चहल हे बसले जातील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.