रेल्वेच्या दिव्यांग बोगीतून प्रवास करणाऱ्या रेल्वे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त यांनी बुधवारी मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यांना दिले आहे. आयुक्तांच्या आदेशानंतर गुरुवारपासून रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) जवानांनी उपनगरीय गाड्यांच्या दिव्यांग डब्ब्यात गर्दीच्या वेळी छापेमारी करून दिव्यांग नसणाऱ्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
( हेही वाचा : राजेश टोपेंनी सांगितलं कधी होणार महाराष्ट्र मास्क मुक्त? )
उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये दिव्यांग लोकांसाठी डबे आरक्षित करण्यात आलेले आहे. मात्र गर्दीच्या वेळी या बोगीतून दिव्यांग नसणारे प्रवासी, रेल्वे कर्मचारी, पोलीस आणि इतर सरकारी प्रवासी सर्रास प्रवास करीत आहे. या प्रवाशांना किती ही सांगून हे प्रवासी बोगीतून न उतरता उलट दिव्यांग असणाऱ्या प्रवाशांना दमदाटी करीत असतात. त्यात रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांची दादागिरी मोठ्या प्रमाणात असते, वाद नको म्हणून अनेक दिव्यांग प्रवासी याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे धडधाकट असणाऱ्या प्रवाशांची दिव्यांग बोगीतून प्रवास करण्याची संख्या वाढली आहे. गर्दीच्या वेळी कल्याण,डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा येथून दिव्यांग बोगीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे.
कारवाई सुरू
याबाबत दिव्यांग प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली असून आम्हाला श्वास घेऊ द्या असे ही काही दिव्यांग प्रवाशांनी पत्रात म्हटले आहे. अखेर या पत्राची दखल घेण्यात आलेली आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना याकडे लक्ष घालण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त यांनी मध्य रेल्वेच्या सर्व रेल्वे सुरक्षा बल ठाण्यांना लेखी आदेश पाठवून गर्दीच्या वेळी दिव्यांग बोगीत छापेमारी करून दिव्यांग बोगीतून प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानंतर मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, दिव्यांग बोगीत छापेमारी करून दिव्यांग नसणाऱ्यांवर रेल्वे कायदा अंतर्गत कारवाई सुरू केली आहे.
Join Our WhatsApp Community