न्यायालयीन कोठडीतून नितेश राणेंना बुधवारी जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी माझ्या आरोग्याबाबत सातत्याने संशय व्यक्त करून प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आम्ही देखील असे प्रश्न उपस्थित करू शकतो, असे नितेश राणेंनी सांगत मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या आजारापणाबाबत सवाल उपस्थित करत निशाणा साधला आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंना जामीन मिळाला आहे. जामिनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का?
नितेश राणे म्हणाले, माझे आजारपण खोटे आहे असे काहीजण म्हणतात. पण मग आरोग्य यंत्रणा ज्या तपासण्या करतात ते सर्व खोटे आहे का? ते म्हणाले, मला आजही जो त्रास होतोय, याच्याही नंतर कोल्हापूरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला असला तरी मी एसएसपीएम रुग्णालयात दाखल होणार आहे. मणका, पाठीचा त्रास, शुगर लो होतेय, त्याचा इलाज करणार, पण जे बोलले हा राजकीय आजार आहे, पण आरोग्य व्यवस्थेने ज्या ज्या टेस्ट केल्या, त्या काही खोट्या होत्या का? आताच माझं बीपी चेक केलं, ते 152 आहे, ते काय खोटं असेल काय? कुणाच्याही तब्येतीबद्दल प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतं का? असे अनेक सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केले.
(हेही वाचा – राजेश टोपेंनी सांगितलं कधी होणार महाराष्ट्र मास्क मुक्त?)
तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात पट्टा का घालतात?
नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत म्हणाले, प्रश्न आम्हीही विचारु शकतो, जेव्हा सरकार पडण्याची वेळ येते, तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लतादीदींच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जातात, त्यावेळी कुठलाही बेल्ट नसतो. अधिवेशनाच्यावेळी ते आजारी कसे पडतात? चौकशीच्यावेळीच महाविकास आघाडीतील नेत्यांना कोरोना कसा होतो? कुणाच्याही आरोग्याबद्दल असे प्रश्न विचारणं, किती योग्य आहे? याचा तपास करणं गरजेचं आहे. राजकारणाचा स्तर किती खालावू शकतो, यावरही विचार करावा. आता मी आराम करणार आहे, दीड महिना मी मतदारसंघात गेलो नाही, गोव्याची जबाबदारी आहे, तिथेही गेलो नाही, तिथेही जाणार आहे. तब्येत सांभाळून मी कामाला लागणार असेही ते म्हणाले