घाटकोपर-मानखुर्दच्या उड्डाणपूलावर चोरांची अशीही हातसफाई! महापालिकेनेही टेकले हात

114

वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावर (घाटकोपर-मानखुर्द जोडमार्ग) बांधण्यात आलेल्या नवीन उड्डाणपुलावर होणाऱ्या अपघातामुळे आधीच चर्चेत असताना आता हे उड्डाणपूल चोरांच्या प्रतापामुळेही चर्चेत आले आहे. आजवर गटारांवरील झाकणे, रस्त्या लगतचे रेलिंग, कचरा कुंड्या आदींच्या चोरीचे प्रकार सर्वांनाच ज्ञात आहेत. परंतु आता उड्डाणपुलांवर दुभाजकांवर सुरक्षेकरता बसलेले लोखंडी क्रॅश बॅरिअर आणि स्टड पोस्ट आदींच्या चोरीनेही महापालिकेच्या पूल विभागाचे अधिकारी हैराण झाले आहेत. या गर्दुले आणि चोरांनी थोड्या थोडक्या वस्तूंची चोरी केलेली नाही तर तब्बल पावणे दोन लाखांची चोरी करत महापालिकेसमोर आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे अखेर महापालिकेने पोलीस ठाण्यात धाव घेण्याची वेळ आली आहे.

लोखंडी दुभाजकाचे जवळपास २०० स्टड पोस्ट चोरीस

वीरमाता जिजाबई भोसले मार्गावरील घाटकोपर-मानखुर्द जोड रस्त्यांवर उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण १ ऑगस्ट २०२१ रोजी करून हा पूल सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले करण्यात आले होते. परंतु त्यानंतर सप्टेंबर २०२१ ते ८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये या पुलावरील लोखंडी दुभाजकाचे जवळपास २०० स्टड पोस्ट आतापर्यंत चोरीस गेल्याची बाब निदर्शनास आली आहे. प्रत्येक स्टड पोस्ट हे अडीच फूट उंचीचे आहे. त्याची किंमत सुमारे १ लाख २० हजार रुपये इतकी आहे. यासोबत १२ इंच जाडीचे लोखंडी क्रॅश बॅरीअर ज्यांची किंमत सुमारे ३० हजार रुपये, १२ मीटर लांब आणि १० इंच रुंदीचे लोखंडी हाईट बॅरीअर  ज्यांची किंमत सुमारे ३० हजार रुपये आणि  सुमारे ३०० नग लोखंडी नटबोल्ट ज्यांची किंमत सुमारे ३ हजार रुपये इत्यादी विविध सुटे भागही चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंचे लक्ष उपनगराकडे: पदपथांपाठोपाठ बस स्टॉपही नवी ढंगात दिसणार )

महानगरपालिकेकडून मुंबई पोलिसांना वेळोवेळी पत्रव्यवहार 

अशाप्रकारे वारंवार उड्डाणपुलावरील दुभाजकाचे स्टड पोस्ट आणि इतर सुट्या भागांची वारंवार चोरी होत महापालिकेच्या पूल विभागाचे सहायक अभियंता ज्ञानेश्वर दगडू उकिर्डे यांनी देवनार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. मुंबईतील अनेक उड्डाणपुलांवर सीसी टिव्ही कॅमेरे बसवलेले असताना या पुलावर अद्यापही कॅमेरे बसवलेले नाही. त्यामुळे या उड्डाणपुलावरील वाहनांची वर्दळ आणि सुट्या भागांची होत असलेली चोरी या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाने मुंबई पोलीस वाहतूक शाखेकडे वेळोवेळी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु महापालिकेच्या मागणी अद्यापही वाहतूक पोलिसांकडून विचार केला जात नाही. त्यामुळे उड्डाणपुलावर सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्पीडोमीटर लावण्याची विनंती पुन्हा एकदा महानगरपालिका प्रशासनाने या पत्रांद्वारे पोलिसांकडे केली आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.