मुंबईतील उड्डाणपूलाखालील भागाचे सुशोभिकरण करण्याची मागणी अर्थसंकल्पामध्ये महापालिका आयुक्तांनी केल्यानंतर उपनगरांमधील पुलाखालील जागांचे सुशोभिकरण आता शासनाच्या निधीतून केले जाणार आहे. नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीमधून आता पूर्व व पश्चिम उपनगरांमधील सहा उड्डाणपुलांखालील भागांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून हे सुशोभिकरण केले जाणार आहे.
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी उपनगरांमधील उड्डाणपूलाखांलील भाग सुशोभित करण्यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा निधी महापालिकेच्या नियोजन विभागाला प्राप्त झाल्यानंतर विभागाच्यावतीने या कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यामध्ये पूर्व व पश्चिम उपनगरांमधील उड्डाणपुलांखालील परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. मुंबईतील उड्डाणपूलाखालील जागांवर वाहनतळ बनवण्यात येवू नये अशाप्रकारचे न्यायालयाचे निर्देश असल्याने बऱ्याच वाहनतळांच्या जागा रिकामी ठेवण्यात आल्या आहे. परंतु या उड्डाणपूलांखालील रिकाम्या जागांमध्ये भिकारी तसेच अनेक बेघरांनी संसार थाटला आहे. त्यामुळे या पुलांखालील भाग गलिच्छ होऊन दुर्गधींही पसरली जाते.
( हेही वाचा : आदित्य ठाकरेंचे लक्ष उपनगराकडे: पदपथांपाठोपाठ बस स्टॉपही नवी ढंगात दिसणार )
कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर
दादर पूर्व येथील नाना शंकर शेट उड्डाणपूल आणि माटुंगा येथील नानालाल मेहता उड्डाणपूलांसह सेनापती बापट मार्गावरील उड्डाणपूलांखाली परिसर सुशोभित बनवून आसपासच्या रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी एक नवीन उद्यान विकसित करण्यात आले आहे. याच धर्तीवर आता उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने नियोजन समितीने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुलांखालील भाग सुशोभित करण्यात येणार असून यासाठी सहा उड्डाणपुलांखालील जागा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी सहा पुलांखालील जागां सुशोभित करण्यासाठी सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली आहे. महापालिकेच्या नियोजन विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपनगरातील सहा उड्डाणपूलांखालील भागांचे सुशोभिकरण शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात येत आहे. याबाबत निविदा मागवण्यात आल्या असून त्यानंतर पात्र कंत्राटदारांची निवड करून कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पुलांखालील भागांचे होणार सुशोभिकरण
- सुधीर फडके उड्डाणपूल
- जनरल करिअप्पा उड्डाणपूल
- वीर सावरकर उड्डाणपूल
- कॅप्टन विनायक गोरे उड्डाणपूल
- मिलन रोड( मीडीयम इंटरवेशन प्रोजेक्ट)
- घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड (जीएमएलआर उड्डाणपूल)