किरीट सोमय्या पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. त्याठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडला असून, त्याचा वापर शक्ती प्रदर्शनासाठी करण्यात आला. भाजपचे नगरसेवक महापालिकेच्या पायऱ्यांवर जमले. ज्या पाय-यांवरुन सोमय्या पडले होते, त्याच पाय-यांवर त्यांचा सत्कार करण्यात आला. सोमय्यांचा शाल, श्रीफळ आणि चाबूक देऊन सत्कार करण्यात आला आहे. हा सत्कार करायला पोलिसांकडून परवानगी नव्हती, मात्र तरीही भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्यांचा त्याच पाय-यांवर सत्कार करण्यात आला.
परवानगी नसतानाही सत्कार
किरीट सोमय्यांचा विजय असो, किरीट भाईंचा विजय असो, अशा जयघोषात पुणे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर भाजपच्यावतीने किरीट सोमय्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पुणे पोलिसांची परवानगी नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यामुळे प्रवेशद्वारावरून पोलिसांना हटावे लागले. महापालिका परिसरात अत्यंत गर्दी झाली होती. भाजपच्या कार्यकर्त्यांबरोबरच असंख्य नागरिकही उपस्थित होते. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र यावेळी दिसून आले. गेटवर मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता. पोलिसांना कार्यकर्त्यांना आवरता आले नाही.
( हेही वाचा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, राजभवनात मोर दिसतात तसे विषारी सापही! )
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
सोमय्या पालिकेच्या आवारात आल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मात्र सोमय्यांना धक्काबुक्की होऊ नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस त्यांना पालिकेत घेऊन गेले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘जिंदाबाद जिंदाबाद, किरीट सोमय्या जिंदाबाद’, ‘एकच भाई, किरीट भाई’, ‘आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय’, अशा घोषणा दिल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
Join Our WhatsApp Community