गोव्यात कोणत्या पक्षाला वाटते आदित्य ठाकरेंची भीती?

शिवसेना वाघ आहे आणि वाघांचा बाजार नसतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

169

गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यासाठी गोव्यातील सत्ताधारी पक्ष भाजपासह इतरही अनेक पक्षांनी शक्तीप्रदर्शन करायला सुरुवात केली आहे. गोव्यात भाजपाच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही गोव्यात जोरदार प्रचार सुरू केला आहे.

शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे गोव्यात शिवसेनेचा प्रचार करत आहेत. तेव्हा आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. अनेकांकडून प्रचाराला येऊ नका असे मला सांगण्यात आले, कोणत्या पक्षाने हे सांगितले ते आता बोलायला नको, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. त्यामुळे गोव्यात नेमक्या कोणत्या पक्षाला आदित्य ठाकरेंची भीती वाटते, हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

प्रत्येक निवडणूक लढवणार

गोव्यात शिवसेना प्रत्येक घरात पोहोचली आहे. गोव्यातील भूमीपुत्रांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही गोव्यात आलो असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोव्यात शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे इथून पुढे आम्ही गोव्यात प्रत्येक निवडणूक लढवणार आहोत, असे देखील आदित्य ठाकरे प्रचारादरम्यान म्हणाले. इतकंच नाही गोव्यासह इतरही सर्व राज्यात शिवसेना निवडणूक लढवेल असेही त्यांनी सांगितले.

गोव्यात कोणाचा विकास झाला?

गोव्यात लोकांचा विकास झाला की ठराविक पक्षांचा विकास झाला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षात एनडीएच्या सर्व मित्रपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला.

वाघांचा बाजार नसतो…

आमचा उमेदवार ज्याठिकाणी आहे तेथे मी प्रचाराला जाणार आहे. त्याठिकाणी इतर पक्षाचा कोण उमेदवार आहे हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. शिवसेना वाघ आहे आणि वाघांचा बाजार नसतो, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.

वचन पूर्ण करणार

शिवसेनेचे जे काही असते ते खुलेपणाने असते. त्यामुळेच गोव्यात आम्ही दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर यांना खुलेपणाने पाठिंबा दिला आहे. जे वचन दिले ते आम्ही पूर्ण करुन दाखवणार आहोत. आम्ही गोव्यातील जनतेची कामे करण्यासाठी आलो आहोत. गोव्यात कोणाला पाठींबा द्यायचा हे गोव्याचे नागरिक ठरवतील असे ते म्हणाले.

आमचा पक्ष मैत्री जपणारा

आमचे गोव्यात 11 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मला विश्वास आहे की आमचे सर्व उमेदवार विधानभवनात जाणार आहेत. आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठिमागे गोव्यातील जनता उभी असल्याचे ठाकरे म्हणाले. दरम्यान, पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे ते म्हणाले. आमचा पक्ष मैत्री जपणारा पक्ष आहे. गोव्यात मोठं मोठे नेते येतात, सभा करतात पण लोकांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आम्ही नागरिकांचा आवाज ऐकण्यासाठी जनतेत आलो असल्याचे सांगत त्यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.