‘या’ प्रकरणात राज ठाकरे झाले निर्दोष मुक्त!

143

रेल्वेत मराठी मुलांची भरती करण्याच्या मागणीसाठी मुंबईत झालेल्या आंदोलनाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्याचे पडसाद जळगावात उमटले होते. या प्रकरणी राज ठाकरेंसह पाच जणांविरुद्ध जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आता सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे प्रकरण

ठाकरे यांनी रेल्वेत मराठी माणसांची भरती करण्यात यावी. यासाठी मुंबईत केलेल्या आंदोलनामुळे त्यांना २१ ऑक्टोबर २००८ रोजी अटक करण्यात आली होती. त्याच तारखेला जळगाव येथे मनसेचे तत्कालीन प्रदेश सरचिटणीस माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांच्या नेतृत्वात वकील जमील देशपांडे, प्रेमानंद जाधव, रज्जाक यासीन यांनी गोलाणी मार्केट परिसरात डिजीटल बॅनरच्या माध्यमातून घोषणाबाजी केली. त्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदरचे आंदोलन दिसले. त्यावेळी आंदोलनकर्त्यांची पळापळ झाली. दरम्यान वाहनांचे नुकसान झाले म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्यामकांत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यासह इतरांचे विरूद्ध २१ ऑक्टोबर २००८ रोजी दंगल माजवणे, मुंबई पोलीस ऍक्ट कलम १३५ यासह सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणे यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

ठाकरेंसह इतर आरोपींना जामीनावर मुक्त

या गुन्ह्यांतर्गत पोलिसांनी १३ जानेवारी २००९ रोजी प्रथम वर्ग न्यायंदडाधिकारी यांच्या न्यायालयात सर्व आरोपींविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. पुढे ठाकरे यांच्यासह सर्व आरोपींना समन्सची बजावण्यात आले. नंतर न्यायालयात ६ एप्रिल २०१३ रोजी सुनावणी झाली असता ठाकरे आणि इतर आरोपी यांना न्यायालयाने जामीनावर मुक्त केले. त्यावेळी ठाकरे आणि इतरांसाठी वकील केतन जे. ढाके यांनी काम पाहिले होते. पुढे याबाबत ठाकरे यांना न्यायालयाने वॉरंट देखील बजावला होता. त्यानंतर पंधरा हजारांचा जामीन मंजूर करून या खटल्यात गैरहजर राहण्याची परवानगी न्यायालयाने ठाकरे यांना दिली होती. या खटल्याच्या कामी राज ठाकरे यांना वैयक्तीक हजेरीपासून सूट देण्यात आलेली होती. पुढे या खटल्याचे कामकाज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. जोशी यांच्यासमोर २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू झाले.

(हेही वाचा – असा जातोय ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात!)

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादीसह इतर पोलीस हवालदार पंच व नुकसान झालेल्या वाहन चालकांच्या साक्ष घेण्यात आल्या. एकंदरीत न्यायालयासमोर आलेला पुरावा पाहता व खटल्यात आरोपी पक्षाकडून केलेला युक्तीवाद लक्षात घेता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जळगाव यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, वकील जमील देशंपाडे, प्रेमानंद जाधव, यासीन रज्जाक यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. सदर खटल्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि इतरांसाठी वकील संदीप गोकुळ पाटील यांनी काम पाहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.