बाबा साहेबांच्या आयुष्यातील ‘तो’ दिवस ‘राष्ट्रीय विद्यार्थी दिन’ व्हावा, राष्ट्रपतींचे मत

106

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाची पूजा केली आणि भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, श्रीमती रमाबाई आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. बाबा साहेब आंबेडकरांच्या गावाला भेट देणारे स्वातंत्र्यानंतरचे रामनाथ कोविंद हे पहिले राष्ट्रपती आहेत. बाबासाहेबांनी सन 1900 मध्ये ज्या दिवशी शाळेत नाव नोंदवले तो 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा व्हावा, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपले मत व्यक्त केले.

काय म्हणाले राष्ट्रपती…

बाबासाहेबांनी सन 1900 मध्ये ज्या दिवशी शाळेत नाव नोंदवले तो 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो, याची राष्ट्रपतींनी विशेष दखल घेतली. महाराष्ट्र सरकारच्या या प्रयत्नाची त्यांनी प्रशंसा केली. बाबासाहेबांशी संबंधित प्रत्येक कार्यक्रमातून आपल्याला करुणाभाव असलेल्या आणि समताधिष्ठित समाजाचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. शिक्षणाविषयीची बाबासाहेब आंबेडकर यांची आस्था आणि महत्त्व सदैव स्मरणात राहावे म्हणून देशभरात 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा आपल्याला विचार करता येईल, असे ते म्हणाले.

(हेही वाचा – असा जातोय ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात!)

आंबडवे या गावाला स्फूर्ती- भूमी हे नाव दिले असल्याचे नमूद करत राष्ट्रपती म्हणाले की, बाबासाहेबांनी आयुष्यभर विविध क्षेत्रांमध्ये आपल्या संपूर्ण ताकदीने मोठे योगदान दिले असल्याने बाबासाहेबांच्या या मूळ गावाला स्फूर्ती- भूमी म्हणणे अतिशय समर्पक आहे. स्फूर्ती- भूमीच्या आदर्शानुसार प्रत्येक गावात एकात्मता, करुणा आणि समता या बाबासाहेबांनी सदैव जपणूक केलेल्या मूल्यांवर आधारित सामाजिक व्यवस्था असली पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले. रत्नागिरी जिल्ह्याने देशाला अनेक रत्ने दिली आहेत, यामध्ये भारतरत्न बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर या अतिशय मौल्यवान रत्नाचा समावेश आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचे हे नाव अर्थपूर्ण बनले आहे, असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.