राज्यातील खारफुटीच्या जंगलाचा कायदेशीर ताबा मिळाल्यानंतर आता वनविभागाच्या कांदळवन कक्षाने अतिक्रमणग्रस्त खारफुटींवर हातोडा मारण्यास सुरुवात केली आहे. मुंब्रा येथील देसाई खाडीतील खारफुटी कापून तयार केलेल्या दोन किलोमीटर रस्त्यावरील जागेची अखेर वनविभागाने जेसीबीच्या साहाय्याने साफसफाई केली.
असा होत होता गैरवापर
मुंब्रा ते दिवा असा दोन किलोमीटरचा रस्ता तयार करुन या भागात वाळूमाफियांचा वावर वाढला होता. या भागाला कायदेशीररित्या राखीव वन घोषित होण्यास विलंब झाल्याने गेली कित्येक वर्षे हा रस्ता वाहतुकीसाठी तसेच गैरकामासाठी वापरला जात होता. या रस्त्यावरच एकाने चक्क लग्नाचा मंडप बांधून व्यवसायही सुरू केला.
(हेही वाचाः प्रात:विधीला निघालेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या)
कार्यवाहीला झाली सुरुवात
गेल्या वर्षी १२ जानेवारीला ठाण्यातील बहुतांश भागांना राखीव वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यात मुंब्र्यातील देसाई खाडीतील कांदळवनाचाही समावेश होता. या जागेचा वनविभागाच्या कांदळवन कक्षाला गेल्या वर्षी जुलै महिन्यात ताबा मिळाल्यानंतर वनाधिका-यांनी या भागाची पाहणी केली असता, या भागातील अतिक्रमणाबाबत त्यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला. अतिक्रमणाबाबत आम्हाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही कार्यवाहीस सुरुवात केल्याची माहिती कांदळवन कक्षाच्या ठाणे परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्रपाल चेतना शिंदे यांनी दिली.
या भागात वाळू उपसा करण्याचा गैरप्रकार सुरू होता. वाळूमाफियांनी वाळू साठवण्याचे दोन हौद येथे बांधले होते. हे दोन्ही हौद वनविभागाने तोडले. या भागांवर आरोपी गणेश पाटील आणि रमेश पाटील यांच्याकडून अतिक्रमण झाल्याचे आम्हाला आढळून आले. आरोपी रमेश पाटीलने चक्क लग्नाचा मंडप उभारला होता. हौद, लग्नाचा मंडप आणि रस्ता असा दीड किलोमीटरच्या परिसरावरील अतिक्रमण शुक्रवारीच्या कारवाईत तोडले गेले. वाळूमाफियांचा शोध सध्या सुरू आहे.
-चेतना शिंदे, वनपरिक्षेत्रपाल, ठाणे परिक्षेत्र, कांदळवन कक्ष, वनविभाग
(हेही वाचाः असा जातोय ‘लालपरी’चा पैसा खासगी चालक-वाहकांच्या खिशात!)
कारवाईचे पथक
ही कारवाई वनविभागाचे कांदळवन कक्ष, मुंब्र्यातील पोलिस आणि ठाण्यातील तहसीलदार कार्यालयांतून संयुक्तरित्या केली गेली.
Join Our WhatsApp Community