पाकिस्तानातून भारतात समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून आलेल्या सर्वात मोठा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या सयुक्त कारवाईत सुमारे २ हजार कोटी रुपयांचा ड्रग्स जप्त करण्यात आलेला आहे, या जप्तीमुळे देशातील आणि देशाबाहेरील ड्रग्स सिंडिकेटला धक्का बसला आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये ५२९ किलो अत्यंत उच्च दर्जाचे चरस, २३४ किलो उत्कृष्ट दर्जाचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन काही प्रमाणात हेरॉईनचा समावेश आहे. या सर्वांची आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत असल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
७६५ किलो ड्रगचा साठा जप्त
पाकिस्तान देशातून समुद्र मार्गाने मच्छिमार बोटीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा भारतात आणला जात असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ला मिळाली होती. एनसीबीने भारतीय नौदलाच्या गुप्तचर विभागाला सूचना दिली. भारतीय नौदल आणि एनसीबीकडून संयुक्तरित्या ऑपरेशन राबविण्यात आले. या दोन्ही यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भरसमुद्रात या मच्छिमार बोटी ताब्यात घेऊन सुमारे ७६५ किलो ड्रगचा साठा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्समध्ये ५२९ किलो अत्यंत उच्च दर्जाचे चरस, २३४ किलो उत्कृष्ट दर्जाचे क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन काही प्रमाणात हेरॉईनचा समावेश आहे. एनसीबीकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिध्दपत्रकात दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या ड्रग्स ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमत आहे.
भर समुद्रात ही पहिलीच कारवाई
एनसीबीकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी ड्रग्सची जप्ती असून भर समुद्रात करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई असून भारतीय नौदलाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले असल्याचे एनसीबीने म्हटले आहे. तसेच यापुढे नौदलाच्या सहकार्यने यापुढेही या प्रकारच्या कारवाई सुरूच राहणार असल्याचेही एनसीबीने म्हटले आहे. आपल्या शेजारच्या देशाकडून भारतात आणि इतर देशामध्ये ड्रग्सचा पुरवठा करण्यासाठी समुद्र मार्गाचा वापर केला गेला असून या ड्रग्स सिंडिकेटचे पाळेमुळे भारतासह इतर देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात पसरले असल्याचे एनसीबीने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community