धुळे तालुक्यातील नंदाणे गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या मामीसह चिमुकल्या भाचीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी ही दुर्देैवी घटना घडली. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. सोनगीर पोलिसात या घटनेची नोंद करण्यात झाली आहे.
…आणि दोघी बुडाल्या
सुंदरबाई समाधान होलार (वय २१ रा. नंदाणे ) व भाची शिवानी आंबा होलार (वय ७ रा.नागद ता.चाळीसगाव) अशी दोघा मृतांची नावे आहेत. सुंदरबाई ही भाचीला सोबत घेऊन, गावालगत असलेल्या पांझर तलावात कपडे धुण्यासाठी गेली होती. सुंदरबाई कपडे धुत असताना, जवळ उभी शिवानी पाय घसरून पाण्यात पडली. तिच्याकडे लक्ष गेल्यावर मामी सुंदरबाई हिने पाण्यात उडी घेत, शिवानीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघीही पाण्यात बुडत होत्या. तेव्हा जवळच्या शेतात गुरे चारत असलेल्या आबा भिल याला तलावात दोन जण पाण्यात पडल्याचे दिसून आले.
( हेही वाचा: भाजपाचे कोण आहेत ते साडे तीन नेते? राऊतांच्या वक्तव्याने सुरु झाला शोध )
‘असा’ झाला तीन जिवांचा अंत
वस्ती जवळच असल्याने, नातेवाईक व गावकरी जमा झाले. तत्काळ मामी भाचीला गावकऱ्यांच्या मदतीने पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना सोनगीर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी यांनी दोघींना मृत घोषित केले. सुंदरबाईचे तीन वर्षांपूर्वी नंदाणे येथील समाधान होलार याच्याशी लग्न झाले होते. पती हा होलार वाजंत्री वाजवतो. तीन वर्षांनंतर सुंदर ही गर्भवती होती. मामीच्या पोटातील गर्भ आणि भाची असा तिनं जणांचा करुण अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पती समाधान छगन होलार यांनी दिलेल्या खबरीवरुन सोनगीर पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community