चक्क ‘या’ कामासाठी एटीएसला घ्यावी लागली फेसबुकची मदत…

106

राज्य दहशतवाद विरोधी पथकातील रिक्त जागा भरण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालक यांना थेट फेसबुकचा आधार घ्यावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एटीएसचे माजी पोलीस अधीक्षक शिवदीप लांडे आणि माजी अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप एकाही अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली नसल्यामुळे या दोन्ही पदाचा आणि स्वतःच्या पदाचा भार अशा एकूण तीन पदांचा भार एकच अधिकारी सांभाळत आहे. एटीएसमध्ये काम करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता नसल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

महत्वाच्या तपास यंत्रणेला उतरती कळा

एकेकाळी राज्य पोलीस दलातील सर्वात महत्त्वाच्या तपास यंत्रणेपैकी एक असलेल्या राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) मध्ये मनुष्यबळाचा अभाव जाणवत आहे. एकेकाळी एटीएसमध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून अनेक कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकारी उत्सुक होते. परंतु मागील १ वर्षांपासून या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या तपास यंत्रणेला उतरती कळा लागली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी शिवदीप लांडे, तसेच अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी सुहास वारके यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या जागेवर अद्याप एकाही अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही. रिक्त झालेल्या पदाचा कार्यभार पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे यांच्यावर आहे. महत्वाचे म्हणजे शिंदे यांची देखील काही महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली झालेली आहे, परंतु मनुष्यबळ अभावी त्यांना अद्याप एटीएसमधून सोडण्यात आले नाही.

(हेही वाचा काँग्रेसच्या ‘सागर’ आंदोलनाचा का झाला फियास्को? जाणून घ्या…)

एटीएसमध्ये जाण्यास अधिकारी उत्सुक नाही

पोलीस अधीक्षकाच्या दोन जागा तसेच अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक दर्जाची एक अशा एकूण तीन जागेवर अधिकारी यांची नियुक्तीसाठी एटीएस प्रमुख विनीत अग्रवाल यांनी राज्य शासनाच्या गृह विभागाला या तिन्ही जागा भरण्यासाठी तसेच अधिक मनुष्यबळ देण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे, परंतु या तीन जागेवर अद्याप नियुक्ती झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एटीएसमध्ये अधिकारी उत्सुक नसल्यामुळे या जागा अद्यापही रिक्त आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी या संदर्भात फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी मुंबईत एटीएसमध्ये पोलीस अधीक्षक पदाच्या दोन जागा रिक्त आहेत. एटीएस पोस्टिंग ही एक प्रतिष्ठित पोस्टिंग आहे ज्यात २५ टक्के विशेष भत्ता आहे. इच्छुक अधिकारी यांनी थेट एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्या सोबत संपर्क साधू शकतात असे म्हटले आहे. मात्र या पोस्ट नंतर ही एटीएसमध्ये जाण्यास कुठलेही अधिकारी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. एटीएसच्या आजी माजी अधिकारी सुत्रांच्या म्हणण्यानुसार मागील काही वर्षांत एटीएसकडे असलेल्या महत्वाच्या आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएकडे सोपवण्यात आल्यामुळे एटीएस केवळ नावाला उरली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील सततच्या भांडणामुळे एटीएसचे कामकाज गुंतागुंतीचे झाले आहे.

एनआयएकडे सोपवण्यात आलेले संवेदनशील प्रकरणे 

एटीएसने इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित त्यांची प्रकरणे – २०१४ मध्ये कल्याण आणि २०१५ मध्ये मालवणी येथील प्रकरण एनआयए हस्तांतरित केले गेले. एटीएसने २००६ आणि २००८ मध्ये मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा तपास पूर्ण केला होता आणि या प्रकरणांवर कारवाई करण्यापूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. ‘अंबानी दहशतवादी धमकी प्रकरण आणि आरोपींकडून युरेनियम मिळविल्या गेलेल्या प्रकरणातही, एटीएसने चांगले काम करूनही तपास एनआयएकडे पाठविला’, असे माजी एटीएस अधिकारी म्हणाले. ‘ज्या अधिकाऱ्यांनी ही प्रकरणे (केंद्रीय एजन्सीकडे) सोपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यासाठी हे अत्यंत निराशाजनक आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.