संजय राऊत हे कोविड घोटाळ्यात अत्यंत वाईटरीत्या अडकले आहेत. म्हणून ते साडेतीन नेत्यांचा विषय बोलत आहेत. त्यांनी आधी ही नौटंकी बंद करावी आणि कोविड काळातील घोटाळ्यामागील उत्तरे द्यावीत, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्रमक पवित्रा घेतला.
कोविड काळात जनतेच्या जीवाशी खेळ खेळला
सोमय्या हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मंगळवारी ते पत्रकार परिषद घेणार आहोत, ज्यामुळे भाजपचे साडेतीन नेते हे तुरुंगात जातील, असा दावा केला आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी आक्रमकपणे मते मांडली. शिवसेनेने कोविड काळात जनतेच्या जीवाशी खेळ खेळला आहे, त्यांना आपण सोडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच काळ्या यादीत टाकलेल्या लाईफलाईनला पुन्हा कंत्राट कसे देण्यात आले? पुण्यात शिवाजी नगर येथे ८०० खाटांचे कोविड सेंटर, वरळी येथे १७०० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यासाठी कशी परवानगी दिली, अशी विचारणा सोमय्या यांनी केली. पैशासाठी माफिया सरदारांच्या कमाईसाठी कोविड काळात जनतेच्या जीवाशी खेळ खेळला. या कंपनीची नोंदणी नाही, या कंपनीने कंत्राटासाठी अर्ज केला नव्हता, असे असूनही या कंपनीला कोविड सेंटरचे कंत्राट दिलेच कसे? याची उत्तरे आधी द्या आणि मग साडेतीन किंवा साडेतीनशे भाजपच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाका, असेही सोमय्या म्हणाले.
(हेही वाचा ‘या’ देशांत व्हॅलेंटाईन डे साजरा होत नाही! ‘रोमन कॅथलिक चर्च’नेही व्हॅलेंटाईनचे नाव यादीतून वगळले)
सेनेच्या पत्रकार परिषदेनंतर गरज पडली तर उत्तर देऊ
या घोटाळ्यातील संजय पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे, दुसरा प्रवीण राऊत हाही संजय राऊत यांचा पार्टनर आहे आणि तो सध्या कारागृहात आहे. उद्या सेनेची पत्रकार परिषद झाल्यावर भाजपचा प्रवक्ता गरज पडली तर उत्तर देईल, असेही सोमय्या म्हणाले. हे घोटाळ्याचे सरकार आहे. या सरकारचे ४० घोटाळे आपल्या हाती लागले आहेत, त्यातील १८ घोटाळ्यांपर्यंत आपण पोहोचलो आहे, असेही सोमय्या म्हणाले.
Join Our WhatsApp Community