मुंबई महापालिकेच्या सभागृहाला लागलेल्या आगीमध्ये जळून नष्ट झालेली तैलचित्र पुनर्निमित करण्यात आलेली असून सभागृहात पुन्हा त्याच जागी ती बसवण्यातही आलेली आहेत. मात्र, तैलचित्रे तयार होऊन अनेक महिने उलटले. तरीही, तैलचित्रांवरील पडदे हटवण्याची महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे आजही पुननिर्मित करण्यात आलेली तैलचित्रे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. स्थायी समितीच्या सभा याच महापालिका सभागृहात होत असल्या तरी त्यांनाही या झाकून ठेवलेल्या तैलचित्रांवरील पांढरे कपडे बाजुला करावे अशाप्रकारची इच्छा होत नाही.
मुंबई महापालिका मुख्यालयाची वास्तू ही श्रेणी २ ब दर्जाची वारसा वास्तूत मोडत आहे. व्हिक्टोरिया वास्तू शैलीतील उत्कृष्ट कलाकुसर असलेले महापालिका सभागृहही वास्तू शैली आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे. या ऐतिहासिक आणि हेरिटेज सभागृहाला सन २०००मध्ये आग लागून झालेल्या दुघर्टनेमध्ये मोठे नुकसान झाले. या सभागृहात असलेल्या ११ पैंकी ९ तैलचित्रे तर या आगीतच नष्ट झाली होती. केवळ जगन्नाथ शंकरशेठ आणि मोरेश्वर वासूदेव दोंदे यांचीच छायाचित्रे सुरक्षित राहिली होती, तेवढीच तैलचित्र सभागृहाच्या नुतनीकरणानंतर पुन्हा लावण्यात आली.
( हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या घरात 25 लाखांचा झगमगाट! )
तैलचित्रे अनावरणाच्या प्रतीक्षेत
त्यानंतर जानेवारी २०१७ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे तैलचित्र नव्याने लावण्यात आले. पण त्यानंतर नष्ट झालेल्या तैलचित्रांच्या पुननिर्मितीचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार त्यांनी ही तैलचित्रे महापालिकेला बनवूनही दिली. महापालिकेच्यावतीने या सर्व तैलचित्रांना पूर्वीच्या जागेवर विराजमान करण्यात आले. परंतु मागील अनेक महिन्यांपासून ही सर्व तैलचित्रे अनावरणाच्या प्रतीक्षेत असून सत्ताधारी पक्षालाही याचे अनावरण करण्याची इच्छा दिसत नाही. परिणामी अनावरणाच्या प्रतीक्षेत असलेली सर्व तैलचित्रे आजही पांढऱ्या कपड्याने झाकून ठेवलेली आहे.
महापालिका मुख्यालयाच्या इमारतीच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या आणि कार्यकारी अभियंता (पुरातन वास्तू) संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुननिर्मित करण्यात आलेली सर्व तैलचित्रे प्राप्त झाली आहे. याच्या अनावरणाबाबतची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच याचे अनावरण केले जाईल. अशी माहिती दिली.
नव्याने पुननिर्मित करण्यात आलेली तैलचित्रे खालील प्रमाणे
सदाशिव कानोजी पाटील, युसुफ जे.मेहेर अली, खुर्शिद फ्रामजी नरीमन, विठ्ठल चंदावरकर, जहाँगीर वी बोमान बेहराम, विठ्ठलभाई जवेरभाई पटेल, इब्राहिम रहिम्तुल्ला, सर फिरोजशहा मेरवानजी महेता, दिनशाँ रदुलजी वाच्छा.
Join Our WhatsApp Community